महाराष्ट्र

Yashomati Thakur : तिजोरी कोरडी, पण सत्ता मात्र शाही

Mahayuti Government : खर्च करा, देणं विसरा, हेच महायुतीचं अर्थसूत्र; ठाकूर यांची टीका

Author

राज्यात आर्थिक तिजोरी कोरडी पडली असतानाही महायुती सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वारेमाप कामांना मंजुरी दिली आहे. या बेफिकीर धोरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक टीकास्त्र सोडत थेट सरकारला जाब विचारला आहे.

राज्याच्या आर्थिक शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची ठपका ठेवत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून कामांना वारेमाप मंजुरी दिली गेली आहे. प्रत्यक्षात तिजोरीत पैसे आहेत की नाही, याची शहानिशा न करता वाटेल तशी कंत्राटं वाटली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्या प्रकल्पांची गरज आहे आणि कुठे खरंच निधी खर्च होणं आवश्यक आहे. याचा कोणताही विचार न करता सरकारनं निव्वळ राजकीय हेतूने निर्णय घेतले आहेत, अशी तीव्र टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटदारांची देणी शून्यावर होती, हे लक्षात आणून देताना ठाकूर म्हणाल्या की, आज महायुती सरकारच्या काळात बांधकाम विभागाचे तब्बल पावणेदोन लाख कंत्राटदार आहेत आणि त्यांची एकूण थकीत बिले ४६ हजार कोटी रुपयांवर गेली आहेत. इतकंच नाही, तर एकूण विविध विभागांची जवळपास 90 हजार कोटींची बिले प्रलंबित आहेत. या देणीसाठी कंत्राटदारांना मंत्र्यांच्या बंगल्यांपासून मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत, पण सरकारकडे त्यांना द्यायला पैसेच नाहीत, ही परिस्थिती दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrapur : विकासाची इमारत उभी करताना, ठेकेदारच पडत आहेत कर्जाच्या खड्ड्यात 

दुर्लक्षामुळे नैराश्यात

या आर्थिक गोंधळाचा सर्वाधिक त्रास प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदारांना होत आहे. सांगली जिल्ह्यातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बिलं मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली येत आत्महत्या केली, हे उदाहरण त्यांनी हळहळीतपणे मांडलं. आज राज्यभरात असे शेकडो कंत्राटदार आहेत जे केवळ थकीत बिलं आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे नैराश्यात जगत आहेत. एका बाजूला हे चित्र आणि दुसरीकडे सरकार मात्र अनावश्यक प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च करतंय, असा संतप्त सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

विशेषतः शक्तीपीठ सारखा महामार्ग प्रकल्प लोकांच्या विरोधात असूनही रेटला जातोय, यावर ठाम भूमिका घेत ठाकूर म्हणाल्या, ज्या प्रकल्पांची राज्याला गरजच नाही, त्यांच्यावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतंय. मग त्या पैशातून कंत्राटदारांची बिले का भागवली जात नाहीत? सरकारचा असा दुटप्पी आणि बेजबाबदार व्यवहार राज्याच्या आर्थिक आरोग्यास घातक ठरतोय, असा इशारा त्यांनी दिला.

Yashomati Thakur : मुख्यमंत्र्यांचं घरकुल स्वप्न, पण जनतेच्या डोळ्यात धूळ

सरकारला इशारा

महायुती सरकारने आजवर आर्थिक शिस्तीचा जराही विचार केलेला नाही, असा आरोप करत ठाकूर म्हणाल्या, राज्यात आज अक्षरशः अनागोंदी आणि बेफिकीरीचं वातावरण आहे. सरकारला तिजोरीत खडखडाट आहे हे कळत असतानाही ते आपल्या मस्तीतील झोपेतच आहे. ही केवळ राजकीय टीका नसून, ती एक इशारा आहे, सरकारने आता तरी जागं व्हावं आणि कंत्राटदारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावं, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

या हल्लाबोलातून स्पष्ट होतं की, आर्थिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवरही सरकार केवळ निवडणुकीचं गणित मांडण्यात व्यग्र आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची उपेक्षा आणि सत्ताधाऱ्यांचा उधळपट्टीचा दृष्टीकोन यामुळे राज्यात असंतोष वाढू लागला आहे. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे सरकारच्या नियोजनावरच नव्हे, तर त्याच्या संवेदनशीलतेवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!