गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खत, बियाणं आणि युरियाच्या महागड्या विक्रीवर कृषी विभागानं मोठी मोहीम राबवली आहे. उडन दले, निरीक्षकांची धाड आणि कारवाईंनी बनावट विक्रेत्यांची झोप उडवली आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये गेला आहे. शेतीची हाडमाशी उचलणाऱ्या बनावट बियाणं विक्रेत्यांविरोधात, उर्वरक व कीटकनाशकात भेसळ करणाऱ्यांविरोधात आणि युरिया महागात विकणाऱ्यांविरोधात आता गोंदिया कृषी विभागानं युद्धपातळीवर मोहीम छेडली आहे.
गोंदिया जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात शेतकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकूण ९ विशेष ‘उडन दले’ (Flying Squads) गठीत केली आहेत. या पथकांनी जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांवर अचानक धाडसत्र सुरू केले असून, या कारवायांना २६ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची जोड दिली गेली आहे. याअंतर्गत कृषी केंद्रांवर थेट जाऊन बियाणे, खत व कीटकनाशकांच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी सुरू आहे.
बेकायदेशीर विक्री
गेल्या काही महिन्यांमध्ये 2025 वर्षात गोंदिया जिल्ह्यात अनेक गैरप्रकार समोर आले असून त्यावर कृषी विभागाने कठोर कारवाई केली आहे. अनेक विक्रेत्यांनी खोटं खत विकून शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ केला, आणि यामुळे 38 कृषी केंद्रांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, आमगाव येथे मध्यप्रदेशातून आणलेलं युरिया खत बेकायदेशीरपणे विकलं जात होतं. यामुळे दोन कृषी केंद्रांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर, एका विक्रेत्याकडून युरिया अत्यंत महाग दराने विकलं जात असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याचा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक नीलेश कानवडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना माफ करण्यात येणार नाही. खोटं खत, बोगस बियाणं किंवा अनधिकृत विक्री यासारख्या प्रकारांवर कठोर कारवाई होतच राहील. हे धाडसत्र केवळ याच हंगामापुरतं मर्यादित न राहता सतत सुरू राहणार आहे. विभागानं शेतकऱ्यांना देखील आवाहन केलं आहे की, जर कोठेही बनावट खत, बी किंवा युरिया महाग दराने विकलं जातं असेल, तर त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा.
फसवणूक मुक्त होण्याची अपेक्षा
बनावट बियाणं आणि खत हे फक्त पैशाचं नुकसान करत नाही, तर शेतकऱ्याच्या मेहनतीला मातीमोल करतं, आणि उत्पादनाची गॅरंटी संपवून टाकतं. म्हणूनच सरकारनं घेतलेली ही कृती एक सकारात्मक पाऊल आहे, जे शेतीला दिशा देणारी ठरू शकते. आता खरीप हंगाम शुद्ध, सुरक्षीत आणि फसवणुकीपासून मुक्त होणार, अशी अपेक्षा आहे. गोंदियाचा कृषी विभाग सज्ज आहे आणि बनावट विक्रेत्यांसाठी ही कारवाई ठरणार आहे, शेतकरीहितासाठीचा निर्णायक दणका.