महाराष्ट्र

Yavatmal : महसूल अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, लाचलुचपत विभागाने धरले रंगेहात

Anti-Corruption Department : पावती होती खरी, पण नीयत होती खोटी

Author

सरकारकडून नियमित पगार घेत असूनही भ्रष्टाचाराची हाव काही शासकीय कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही. यवतमाळमध्ये लाच घेताना महसूल विभागाच्या पाच जणांना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारी नोकरीतील भरघोस पगार असूनही काही कर्मचारी आणि अधिकारी सत्तेचा गैरवापर करत जनतेच्या पैशावर डल्ला मारतात. यवतमाळ जिल्ह्यात अशाच भ्रष्ट मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांचा बुरखा अखेर फाटला आहे. नियमशीर व्यवसाय करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडून लाच मागून महसूल विभागातील एक मंडळ अधिकारी, तीन ग्राम महसूल अधिकारी आणि एक खासगी मजूर अशा पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

दारव्हा तालुक्यातील एका ट्रॅक्टर मालकाकडे मुरूम वाहतुकीचा कायदेशीर व्यवसाय असून, सर्व संबंधित कागदपत्रे त्याच्याकडे होती. 21 जुलै रोजी त्याचा ट्रॅक्टर पंचर झाल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्या मार्गाने जाणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची धमकी देत ट्रॅक्टर मालकाकडून तब्बल 40 हजार रुपयांची लाच मागितली. कागदपत्रं असूनही त्यांच्या अडवणुकीमुळे तक्रारदाराने त्या दिवशीच 17 हजार रुपये रोख देत ट्रॅक्टरचा ताबा सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र उर्वरित 23 हजार रुपयेही देण्याची सक्त मागणी करण्यात आली.

Gondia : खतामधील विषाचे बीज उखडले, कृषी विभागाचा अटॅक

हजारोंची रक्कम

या प्रकाराने त्रस्त झालेल्या ट्रॅक्टर मालकाने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. विभागाने तक्रारीची खातरजमा करून गुरुवारी दारव्हा तालुक्यातील बागवाडी बसस्थानकाजवळ सापळा रचला. आरोपींनी पहिल्या हप्त्यापोटी सात हजार 500 रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्यावर, त्यातील खासगी मजूराने ती रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाने धाड टाकली. त्या क्षणी मंडळ अधिकारी, तीन ग्राम महसूल अधिकारी आणि मजूर या पाच जणांना रंगेहात अटक करण्यात आली.

लाचलुचपत विभागाकडून पकडले गेलेल्यांमध्ये जितेंद्र पांडुरंग ठाकरे (57) मंडळ अधिकारी, महागाव कसबा. जय गणेश सोनोने (26), ग्राम महसूल अधिकारी, हरू. पवन तानसेन भितकर (30), ग्राम महसूल अधिकारी, पाळोदी. नीलेश भास्कर तलवारे (30), ग्राम महसूल अधिकारी, हातणी; आणि अशोक श्रावण रणखांब (60), खासगी मजूर. हे सर्वजण दारव्हा तालुक्यातील विविध गावांतील रहिवासी आहेत.

पोलिसांच्या निरीक्षणात कारवाई

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जुन धनवट यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अतुल मते, अब्दूल वसीम, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई, भागवत पाटील, सूरज मेश्राम व अतुल नागमोते यांनी सक्रिय सहभाग घेतला. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत दारव्हा पोलीस ठाण्यात सुरू होती.

ही घटना महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी जर स्वतः कायद्याचा गैरवापर करत असतील, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? पण यामध्ये महत्त्वाचे म्हणजे एका जागरूक नागरिकाच्या धाडसी तक्रारीमुळे हा प्रकार उघड झाला. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी अशा अन्यायाविरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे.

या कारवाईने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे की, शासनाचे हात लांब असून कुणालाही वाचता येणार नाही. भ्रष्टाचार करताना विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा, ‘लाच’ घेणाऱ्यांचे हात आता ‘कानाला’ जाऊ लागले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!