अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीत 24 हजाराहून अधिक नावे दोनदा-तिनदा आढळल्याचा भाजपचा गंभीर आरोप आहे. या त्रुटींवर तातडीने कारवाई करून यादी दुरुस्त करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला बसलेला पराभव सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या पराभवाचे खापर भाजपने थेट मतदार यादीतील गंभीर चुका व घोळांवर फोडले आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपच्या मते, अकोला पश्चिम मतदारसंघातील यादीत सुमारे 24 हजार मतदारांची नावे दोनदा, काहींची तर तिनदा नोंद झाली आहेत. एवढेच नव्हे तर, इतर मतदारसंघातील, विशेषतः बाळापूर येथील – सुमारे 1 हजार 400 मतदारांची नावेही या मतदारसंघात चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या यादीने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
Yavatmal : महसूल अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, लाचलुचपत विभागाने धरले रंगेहात
शिष्टमंडळाची ठाम भूमिका
घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगासमोर ठोस पुराव्यांसह आपली भूमिका मांडली. त्यांनी आयोगाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, अशा प्रकारचे त्रुटीपूर्ण मतदान यादीमुळे लोकशाहीची मूलभूत मूल्ये डागाळली जात आहेत. अकोला पश्चिममध्ये एकाच मतदाराचे नाव दोन ते तीन वेळा नोंद होणे, हे केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेसमोरील गंभीर आव्हान आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरीत यादी पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत हे प्रकार लक्षात आल्यामुळे यादीतील त्रुटींचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. त्यामुळेच ही दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही बाब केवळ अकोला पश्चिमपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्याच्या यादींच्या पडताळणीची प्रक्रिया राबवावी, असा आग्रह भाजपने धरला आहे. या मागणीला पाठबळ देण्यासाठी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. लोकसभेचे खासदार अनुप धोत्रे यांच्या मार्फत तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. या यादीदुरुस्तीच्या मागणीला आता केंद्रीय यंत्रणेचाही पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
त्रुटी सुधारण्याचा दिलासा
घडलेल्या प्रकरणावर निवडणूक आयोगानेही अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, अकोला पश्चिम मतदारसंघातील यादीतील 24 हजाराहून अधिक पुनरावृत्त नावे आणि बाळापूरमधील 1 हजार 400मतदारांची नावे हटवण्यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या दक्षतेची परीक्षा लागणार असून, पारदर्शकतेच्या निकषांवर खरा उतारा दिला जातो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि पुराव्यांच्या आधारे केलेली तक्रार यामुळे मतदार यादी सुधारणेचा विषय सध्या राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे.