माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाचे दर्शन घेतल्यावर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या शनिदर्शनावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर बोचरी टीका करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शनिवारी शनिमंदिरात जाऊन शनैश्वर महाराजांची पूजा केली. संकटातून सुटका व्हावी आणि आयुष्यातील साडेसाती दूर व्हावी, यासाठी त्यांनी शनिदेवाच्या चरणी साकडे घातले. शनिवारी शनिदेवाच्या पूजेसाठी योग्य दिवस मानला जातो. त्यामुळेच कोकाटेंनी शनिमंडळ येथे विधिवत पूजाअर्चा केली.
धार्मिक पूजेनंतर त्यांच्या या कृतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरु झाली. एकीकडे कोकाटेंनी पूजा करताना संपूर्ण राज्यातील संकट दूर होण्याची भावना व्यक्त केली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकारावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. कोकाटेंच्या शनि पूजेला त्यांनी राजकीय स्वार्थाचे रूप ठरवत खडसावले.
संकटात शनिदेवाची आठवण
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. शनिदेवाच्या पूजेच्या निमित्ताने कोकाटेंच्या संकटावर त्यांनी मार्मिक भाष्य करत अडचणीत आलेल्या नेत्यांनी धार्मिकतेचा आधार घेतलेला प्रकार गंभीरतेने घेतला. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण भल्याभल्यांना फक्त संकटाच्या काळातच होते. त्या आधी चुकीची कृत्ये करताना कोणत्याही मंत्री किंवा पदाधिकारीला शनिदेव आठवत नाहीत. ते पुढे म्हणाले की, तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे असे कधीच शनिदेव सांगत नाहीत. शेतकऱ्यांच्या जीवनात दुष्काळ, कर्जबाजारीपणा, आत्महत्या यासारख्या समस्या विदारक वास्तव निर्माण करत असताना कृषी खाते जबाबदारीने काम करत नाही. मात्र संकट स्वतःवर ओढवले की मंत्र्यांना पूजाअर्चा आठवते, ही मानसिकता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखी आहे.
रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले की, राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कृषी विभागाच्या कामकाजातील अपयशामुळे शेतकऱ्यांना योग्य सुविधा मिळत नाहीत. त्याचबरोबर मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागालाही तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पिढा दूर करण्यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना करण्यापेक्षा शासनाने आपल्या यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, तेलाचा अभिषेक करून आपले राजकीय पाप धुवता येणार नाही. शासनाचे जबाबदार मंत्री म्हणून आपली नैतिकता जपणे अधिक महत्त्वाचे आहे. जनता सध्या अस्वस्थ आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींना शासनाने तातडीने प्रतिसाद देण्याची गरज आहे. पूजाअर्चा म्हणजे जबाबदारीपासून पळण्याचा मार्ग नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
राजीनामा आता औपचारिकता
राज्य विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी तीव्र स्वरात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या कृतीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. खुद्द अजित पवारांनी मंगळवारपर्यंत या प्रकरणी कठोर निर्णय घेणार असल्याचे सूचित केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा आता निश्चित मानला जात आहे. शनिदेवाच्या चरणी केलेली पूजा, प्रार्थना आणि साकडे यामुळे त्यांना राजकीय संकटातून दिलासा मिळेल अशी काहींची भावना असली तरी प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवरच त्यांचे भविष्य ठरणार आहे.