दर्यापूर येथे पार पडलेल्या न्यायमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेतील सध्याच्या वर्तनशैलीवर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, सत्तेची खुर्ची डोक्यात गेली की न्याय हरवतो, माणुसकी लोपते. त्यांनी न्यायाधीशांना उद्देशून दिलेला हा इशारा केवळ एक भाषण नव्हे, तर न्यायाच्या मूल्यांची उजळणी करणारा समर्पक संदेश ठरला.
गवई यांनी एका गंभीर घटनेचा उल्लेख केला, एका कनिष्ठ न्यायाधीशाने इतक्या रागाने एका वकिलावर शब्दांचा प्रहार केला की, त्या वकिलाला न्यायालयातच बेशुद्ध व्हावे लागले. अशा वर्तनामुळे न्यायालयीन प्रतिष्ठा आणि मानवी संवेदनशीलता दोन्ही धोक्यात येते. ज्येष्ठ वकिलांच्या अनुभवाचा अपमान आणि कनिष्ठ वकिलांवर अन्याय, हे खपवून घेता येणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.
घमंडी वृत्तीला जागा नाही
न्यायालय म्हणजे सत्ता गाजवण्याची जागा नाही. ती सहकार्य, सुसंवाद आणि संयम यांची तपश्चर्या आहे. वकील आणि न्यायाधीश हे न्यायव्यवस्थेची दोन चाके आहेत,दोघेही समान आहेत. यामध्ये अहंकाराला जागा नाही, अशा शब्दांत त्यांनी अनेक न्यायाधीशांना सजगतेचा इशारा दिला. या कार्यक्रमात दर्यापूर जिल्हा न्यायालयाच्या नव्या, सुसज्ज इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
सरन्यायाधीश गवई यांनी हेही नमूद केलं की, मी इथे सरन्यायाधीश म्हणून नाही, तर दर्यापूरचा एक सुपुत्र, एक ग्रामस्थ म्हणून आलो आहे. माझ्या गावात इतकं सुसज्ज न्यायालय उभारलं जात आहे, ही बाब मला अभिमानाची आणि समाधानाची वाटते.” त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवण्याचा मार्ग आता अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मुलभूत अधिकार
न्यायदान हे पवित्र कार्य असून, ते कोणत्याही पूर्वग्रहदूषित विचारांशिवाय व्हायला हवे, असा मूलगामी विचार गवई यांनी मांडला. संविधान हेच आमचं मार्गदर्शक आहे. महिला सबलीकरणाचे कायदे, मुलभूत अधिकार, जबाबदाऱ्या, यांचे काटेकोर पालन करणे ही आमची भूमिका आहे. अनुभवाच्या आधारे, संयमाने आणि माणुसकीने निर्णय घेणे हेच न्यायाचे खरे स्वरूप आहे, असे ते म्हणाले.
गवई यांनी आपल्या भाषणातून न्यायव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख होण्याची संधी दिली. न्यायाधीश असो किंवा वकील, न्यायालयीन साखळीत प्रत्येक दुव्याचा सन्मान राखणे अत्यावश्यक आहे. अहंकारापेक्षा अनुभवाला आणि अधिकारापेक्षा जबाबदारीला अधिक महत्त्व देणारी ही न्यायसंस्कृती रुजली, तरच भारतातील लोकशाही अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांच्या शब्दांमधून प्रकट झाला.
यावेळी खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, प्रवीण पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष धमेंद्र आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.