राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांमधील अधिकारवाटपाच्या मुद्द्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी वाद न वाढवता संयमाने राजकीय समन्वय साधण्याचा संदेश दिला आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेले मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील वादावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे स्पष्टीकरण देत शांततेचा संदेश दिला आहे. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यातील समन्वय कायम ठेवण्यासाठी अधिकारवाटपाचा विचार सुरु आहे, असे नमूद करत त्यांनी सुरू असलेल्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना काही अधिकार दिले जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकत्रितपणे कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे, हे ठरवले जात असून त्या अनुषंगाने अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
मतभेदांवर शांत भूमिका
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील तणावाला माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर उचलून धरले असले तरी महसूलमंत्री बावनकुळे यांनी या वादात भडकावणाऱ्या भाष्याला पूर्णपणे फाटा दिला. त्यांनी सांगितले की, दोघांमध्ये फार मोठा वाद नाही. काही पत्रव्यवहारांमधून कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त झाली असली तरी ही अंतर्गत बाब असून ती सकारात्मक मार्गाने सोडवली जाईल. शासकीय कामकाजामध्ये समन्वय राखणे आवश्यक असून त्यासाठी मंत्रिमंडळातील वरिष्ठ आणि कनिष्ठ मंत्र्यांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. बावनकुळे यांनी याच मुद्यावर भर देत सांगितले की, कोणत्याही वादामुळे जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींची प्रतिमा घसरता कामा नये, याची जबाबदारी प्रत्येक मंत्र्याने लक्षात ठेवावी.
जबाबदारीने वागण्याची गरज
बावनकुळे यांनी सूचकपणे सांगितले की, मंत्रिमंडळ फेरबदल, अधिकारवाटप किंवा नव्या नियुक्त्यांबाबत कोणतीही माहिती ही अधिकृत माध्यमांतूनच दिली जाते. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभाध्यक्षपदाच्या चर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, कोअर कमिटीमध्ये पत्रकार नाहीत, त्यामुळे अशा बातम्या कुठून येतात हे सांगता येणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रीपदांच्या अधिकारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्या पक्षनेत्यांकडे असून अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्र्याच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्य मंत्रिमंडळातील अनुभवी आणि समन्वयवादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी यावेळी सर्वच मंत्र्यांना उद्देशून सांगितले की, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी आदर टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडल्या पाहिजेत. वाद, मतभेद हे प्रशासनाचा भाग आहेत, परंतु त्यांचा परिणाम जनतेच्या मनोविश्वावर होणार नाही याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.