महाराष्ट्र

Nagpur Police : नशेच्या वेगाला पोलिसांनी दिला ‘यू-टर्न’

Drunk & Drive : ब्रीथ अॅनालायझरच्या शिडीवर चढला नशेखोरांचा गुन्हेगारी आलेख

Author

शहरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांचा वेग अखेर पोलिसांनी ‘यू-टर्न’ मोहीमेतून थांबवला आहे. अवघ्या 18 दिवसांत 636 नशेखोर चालकांवर कारवाई करत वाहतूक पोलिसांनी कायद्याचा जोर दाखवून दिला आहे.

शहराच्या रस्त्यांवर बेधुंद वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे जीव गमावणाऱ्या अपघातांची मालिका आता यू-टर्न घेत आहे. नागपूर शहरात दिवसेंदिवस मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी, नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाने ‘ऑपरेशन यू-टर्न’ नावाने एक विशेष आणि धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेला सुरुवात होऊन केवळ 18 दिवस होत असताना पोलिसांनी 636 नशेखोर वाहनचालकांवर कडक कारवाई केली आहे. ही केवळ एक आकडेवारी नसून, या आकड्यांमधून नागपूरच्या रस्त्यांवरील शिस्त परत येण्याची सुरूवात झाली आहे.

कडक तपासणी

‘ऑपरेशन यू-टर्न’च्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी शहरातील 10 ठिकाणी नियोजनबद्ध नाकाबंदी केली. यामध्ये इंदोरा, कामठी रोड, सोनेगाव, एम.आय.डी.सी., सदर, कॉटन मार्केट, लकडगंज, अजनी, सीताबर्डी आणि सक्करदरा यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी ब्रीथ अॅनालायझर तपासणी, लाइसन्सची पडताळणी आणि वाहन जप्तीच्या कडक कारवाया करण्यात आल्या.

इंदोरा परिसरात सर्वाधिक 94 नशेखोर चालकांना, तर कामठी रोडवर 86, सोनेगावमध्ये 78, एम.आय.डी.सी.मध्ये 77, सदर भागात 65, कॉटन मार्केटमध्ये 60, लकडगंजमध्ये 59, अजनीत 56, सीताबर्डीत 35 आणि सक्करदरामध्ये सर्वात कमी 26 चालकांवर कारवाई झाली. या मोहिमेत केवळ दंड आकारण्यापुरती मर्यादा न ठेवता, अनेक वाहनचालकांची गाडी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर कारवाईची शिफारससुद्धा करण्यात आली आहे.

Nagpur : जेल गेले स्मार्ट सिटीकडे, वारसा गेला संग्रहालयात

आकडा हजारांवर पोहोचला

या वर्षात आतापर्यंत नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी एकूण एक हजार 324 नशेच्या अवस्थेतील वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाईपैकी जवळपास 50 टक्के म्हणजे 636 कारवाया ‘ऑपरेशन यू-टर्न’च्या केवळ १८ दिवसांतच झाल्या आहेत. या आकड्यांवरून ही मोहीम केवळ कडक नाही, तर अत्यंत प्रभावी ठरली आहे, हे स्पष्ट होते.

या मोहिमेचा उद्देश फक्त नियम तोडणाऱ्यांना पकडणे नाही, तर शहरातील नागरिकांना वाहन चालवताना जबाबदारीची जाणीव करून देणे आहे. नियमांचे पालन केल्यास एकट्याचेच नव्हे, तर इतरांचेदेखील प्राण वाचतात, हा संदेश ‘ऑपरेशन यू-टर्न’ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहे. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक रस्त्यांवर वारंवार अपघात होत होते. त्यामागे बहुतांश वेळा नशेच्या अवस्थेतील चालक हे कारण होते. त्यामुळे या मोहिमेमुळे रस्त्यांवरील संभाव्य दुर्घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

कडेकोट यंत्रणांवर भर

येत्या काळात ही मोहीम आणखी अधिक सुसज्ज करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून आता सीसीटीव्ही, ANPR (Automatic Number Plate Recognition) कॅमेरे, रँडम चेकिंग, मोबाइल तपासणी यंत्रणा आणि जनजागृती कार्यक्रमांतून ‘ऑपरेशन यू-टर्न’चा व्याप वाढवण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे, परंतु तरीही अजूनही काही ठिकाणी बेफिकिरी दिसून येते. म्हणूनच पोलिस विभाग सतर्क असून, अशा लोकांना कोणतीही सवलत न देता थेट कायद्याच्या अटकेत घेत आहे.

‘ऑपरेशन यू-टर्न’ ही नागपूर पोलिसांची एक धाडसी आणि दूरदृष्टी असलेली मोहीम आहे. हे फक्त नियमांची अंमलबजावणी नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकासाठी एक इशारा आहे, वाहन चालवताना नशा करू नका, कारण हा रस्ता अपघाताच्या नव्हे, तर जबाबदारीच्या दिशेने वळवण्याची वेळ आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!