WGM दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आहे.
नागपूरच्या मातीत जन्मलेली आणि आता संपूर्ण जगभरात बुद्धिबळाच्या पटावर आपली छाप सोडणारी वुमन ग्रँडमास्टर (WGM) दिव्या देशमुख हिने इतिहास रचला आहे. जॉर्जियाच्या बाटुमी येथे पार पडलेल्या FIDE वूमन्स चेस वर्ल्ड कप स्पर्धेत दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला पराभूत करत ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. ही कामगिरी केवळ तिच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण देशासाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. देशभरातून तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केलं जात आहे. पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व स्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या गौरवाच्या क्षणात नागपूरने आपली संपूर्ण ताकद लावली.
30 जुलै रोजी विमानतळावर दिव्याचं आगमन जणू एक सणच ठरला. ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि ‘दिव्या देशमुख विजयी भव’ अशा घोषणा नागपूरच्या आसमंतात घुमल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक नाव ठळकपणे पुढे येत आहे. ते म्हणजे भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. बुद्धिबळाच्या विश्वात माहीर असलेले डॉ. फुके हे केवळ एक राजकीय नेते नाहीत, तर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहेत. दिव्या देशमुखच्या यशानंतर त्यांनी जाहीरपणे तिचे कौतुक करत तिला जिद्द, आत्मविश्वास आणि प्रतिभेचे प्रतीक म्हटले. डॉ. फुके यांनी नेहमीच तरुण खेळाडूंना व्यासपीठ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
डबल गेमची रणनीती
डॉ. फुके म्हणाले, बुद्धिबळ हा खेळ शांत असला तरी त्यामागे असते ती आक्रमक रणनीती आणि धैर्य. दिव्या याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तिचा विजय हा केवळ एका खेळाडूचं यश नाही, तर ती नव्या भारताची प्रेरणा आहे. राजकारणात चतुर खेळी खेळणाऱ्या डॉ. फुके यांची बुद्धिबळातील चालीही तितक्याच परिणामकारक आहेत. एकीकडे भाजपा नेतृत्त्वाखाली राजकीय समीकरणं सांभाळणे, तर दुसरीकडे राज्यातील बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ही त्यांचा ‘डबल गेम’ नेहमीच चर्चेचा विषय ठरते. डॉ. फुके सध्या राजकीय सभा, भाषण आणि सोशल मीडियावरची क्रिएटिव्ह पोस्टिंग यापासून काहीसं बाजूला राहून थेट मैदानात उतरत खेळाडूंना बळकटी देण्याच्या कार्यात गुंतले आहेत. हे समाजपरिवर्तनाचे सकारात्मक पाऊल आहे.
डॉ. फुके यांनी जणू नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. दिव्या देशमुखचे यश हे केवळ तिच्या बुद्धिमत्तेचे आणि मेहनतीचे फलित नाही, तर तिच्या मागे उभ्या असलेल्या संघटनांचे, प्रशिक्षकांचे आणि त्या साऱ्यांना सहाय्य करणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचेही यश आहे. डॉ. फुके यांच्यासारखे नेते जर अशी सकारात्मक दिशा देत राहिले, तर महाराष्ट्रातून अजून कितीतरी दिव्यांची जन्मजन्मांतरीची कहाणी लिहिली जाईल. बुद्धिबळ या शांत खेळाने आता नव्या जोमाने जनमानसात रुजायला सुरुवात केली आहे. याचे श्रेय निश्चितच त्या नेतृत्वाला द्यायला हवे, जे शाब्दिक भाषणांपेक्षा खऱ्या कृतीवर विश्वास ठेवतात. त्या यादीत डॉ. परिणय फुके यांचे नाव सर्वात वर आहे.