अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणभेरीसाठी तयारीचा धुरळा उडू लागला आहे. प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
राजकारणाचं रंगमंच उभं राहायला लागलंय, आणि त्यावर पुढील नगरसेवकांच्या निवडीचं नाट्य रंगायला सज्ज होतंय. अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. येत्या 8 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना पूर्ण होणार असून, त्यानंतर संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. यामुळे दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता अधिकच बळकट झाली आहे.
मनपा प्रशासनाने प्रभाग संरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. सर्वसामान्य जनतेकडून सूचना व आक्षेप मागवले जातील आणि त्या लक्षात घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रत्येक वॉर्डच्या सीमा निश्चित केल्या जातील आणि त्यासोबतच मतदार यादी विभागणीचा कार्यक्रम राबवला जाईल. हा सर्व प्रक्रियात्मक फेरफार पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना आणि मतदारसंघ निर्धारण करून संपूर्ण प्रस्ताव पुन्हा एकदा आयोगाकडे पाठवला जाईल. निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
Vijay Wadettiwar : दारूच्या ग्लासात शासनाची प्रतिष्ठा विरघळली
अधिक वेळ देण्याची गरज
सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये प्रशासनिक कामांचा भार आणि संसाधनांची मर्यादा पाहता आयोगाला अधिक वेळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच अकोला महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
राजकीय निरीक्षक आणि निवडणूक अभ्यासकांच्या मते, अकोला महापालिकेची निवडणूक 2025 वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण प्रभाग रचना, मतदार यादी, आक्षेप-सूचना आणि आयोगाच्या मंजुरीनंतर निवडणूक आयोग निवडणुकीची अधिसूचना जारी करेल. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी आपले पाशील बसवायला सुरुवात केली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे.
Shalartha Id Scam : नागपूरचे दोन शिक्षणाधिकारी अखेर चौकशीच्या पिंजऱ्यात
चुरशीची लढत
अकोला महानगरपालिका भाजपसाठी एक अभेद्य किल्ला मानली जाते. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), शिंदे गट आणि इतर स्थानिक आघाड्यांनी देखील या किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. अकोल्याच्या शहर विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे आणि स्मार्ट सिटी प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांवर मतदार नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक फक्त जागांवरची लढाई न राहता, अकोल्याच्या भविष्याचा निर्णय करणारी एक निर्णायक लढत ठरणार आहे.
एकंदरीत, अकोल्यात सत्तेचा दांडोरा नव्याने वाजणार की सत्तांतराची नांदी होणार, हे येणाऱ्या काही महिन्यांत स्पष्ट होईल. मात्र इतकं नक्की की, ‘मनपा रणभूमी’ सज्ज झाली आहे, आता वाट आहे फक्त रणशिंग फुंकण्याची.