प्रकाश आंबेडकर यांनी पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पच्या मैत्रीवर जोरदार टीका करत ट्रम्पना ‘कपटी मित्र’ ठरवलं आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणाला अपयशी म्हणत सरकारवर साधला निशाणा.
भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे नवे पर्व मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध नेहमीच जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरतात. अब की बार, ट्रम्प सरकार पासून Howdy Modi पर्यंत या मैत्रीचा जयघोष होतो. पण याच मैत्रीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडताना ट्रम्प यांना कपटी मित्र असे संबोधले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाला थेट ‘अपयशाचे प्रतीक’ ठरवले आहे. मोदींचा मित्र ट्रम्प भारतासाठी डोईजड ठरत आहे, असे म्हणत आंबेडकरांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मोदींच्या यशाची व्याख्या करताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले, कपटी मित्र आणि गोंधळलेले परराष्ट्र धोरण एवढंच त्यांच्या ‘सफलतेचं’ गमक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर थेट 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय निर्यातदारांसाठी ही एक मोठी चिंता ठरत असताना प्रकाश आंबेडकर यांनी या पार्श्वभूमीवर मोदींच्या ट्रम्प सोबतच्या मैत्रीला प्रश्नांत अडकवले. मी आधीच विचारले होते की ट्रम्प हा कशा प्रकारचा मित्र आहे? मित्राच्या नावाखाली तो पाकिस्तानशी जवळीक साधतो. भारतावर आर्थिक दडपण आणतो आणि आपल्या देशाच्या स्वाभिमानाला सुरुंग लावतो, अशी आगपाखड करत त्यांनी मैत्रीच्या साखरपुड्याला कडवट वास्तवाची चव दिली.
Yashomati Thakur : मृत झालेल्यांना न्याय देण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांना आहे का?
शस्त्रसंधीवरून विश्वासघात
रशियाकडून भारताने लष्करी साहित्य खरेदी केल्यास दंड ठोठावण्याचा इशारा देणे, भारतावर दबाव आणणे तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत तेल व्यापाराचा करार ही ट्रम्प प्रशासनाची धोरणे प्रकाश आंबेडकरांच्या मते थेट भारतविरोधी आहेत. मोदींचा हा मित्र खरंच मित्र आहे का? की तो देशासाठी शत्रूसम वागतोय? असा सवाल त्यांनी पुन्हा उपस्थित केला. या मैत्रीचा भार संपूर्ण देशाला सहन करावा लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी देशासमोर ट्रम्पला आपला मित्र म्हणून मांडलं. पण त्या मैत्रीचा पराभव आता भारताच्या स्वावलंबी धोरणांना भोगावा लागत आहे, असं ते म्हणाले. भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीची माहिती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून मिळाली, ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांना खटकली. ही माहिती भारताच्या पंतप्रधानांकडून आली असती, तर अधिक विश्वासार्ह वाटली असती, असं सांगत त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
आंबेडकर यांच्या मते, पाकिस्तान आक्रमक होता. आपल्याकडे निर्णायक संधी होती, पण आपण ती गमावली. पाकिस्तानकडे केवळ दहा दिवस पुरेल इतकाच दारुगोळा होता. त्या काळात निर्णायक कारवाई करणे शक्य होते. पण अमेरिकेच्या नियंत्रणात आल्याने आपण ती संधी हातातून घालवली, असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला.प्रकाश आंबेडकरांनी यावेळी जी टीका केली ती केवळ राजकीय नव्हे, तर सामरिक, आर्थिक आणि कूटनीतिक पातळीवर केंद्र सरकारच्या धोरणांची चिकित्सा करणारी होती. एका बाजूला मैत्रीच्या घोषणा, दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय दबाव हे वास्तव आता जनतेसमोर आणण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. देशहितासाठी प्रश्न विचारणे हे देशद्रोह नसून, खरी देशभक्ती आहे, असं ठाम मत मांडत त्यांनी मोदी-ट्रम्प मैत्रीला जगप्रसिद्ध अपयश ठरवलं.