उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आणि निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे.
देशातील संसदीय राजकारणाचा रंगमंच सध्या रंगतदार नाट्यानं गाजत आहे. 21 जुलै 2025 रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली खरी, पण त्याच संध्याकाळी राजकीय वादळ उठवणारी एक मोठी घोषणाही झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशात आश्चर्याची लाट उसळली. धनखड यांनी राजीनाम्याचे कारण प्रकृती असे सांगितले. पण विरोधकांनी या घटनेवरून सरकारला चांगलेच घेरले. पहिल्याच आठवड्यात पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.
अधिवेशनाच्या या गदारोळात उपराष्ट्रपतीपद रिक्त राहिलं आणि आता निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत या शून्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. ती म्हणजे 9 सप्टेंबर 2025. याच दिवशी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. उमेदवारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट असून, 25 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे की, कोण होणार देशाचा नवा उपराष्ट्रपती? धनखड यांचा राजीनामा 21 जुलै रोजी रात्री उशिरा आला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले.
Prakash Ambedkar : मनुस्मृतीत ब्राह्मण कधी दोषी ठरत नाही… आजही तसंच
बिहार उमेदवार चर्चेत
प्रकृतीच्या कारणांमुळे पद सोडतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू म्हणजे धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी कोण असेल सत्ताधाऱ्यांचा उमेदवार? खास करून बिहारचं नाव वारंवार चर्चेत आहे. तिथे लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे भाजपाकडून बिहारमधील कोणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या एका आमदाराने नितीश कुमार यांचे नाव पुढे करत सांगितले की, उपराष्ट्रपती म्हणून नितीश कुमार यांची निवड झाली तर आम्हाला अभिमान वाटेल. याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
ठाकूर यांचे नावही संभाव्य उमेदवारांमध्ये मोजले जात आहे.उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्याही पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नसला तरी राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींनी वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही हे पद मिळवण्यासाठी आपापल्या बळाचा वापर करताना दिसतात. 21 जुलै पासून सुरू झालेले लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळातच उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही रंगणार आहे. त्यामुळे सध्या दिल्लीच्या वर्तुळात एकच प्रश्न गाजतोय देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण? राजकारणातील ही नवी शर्यत फक्त एका मताच्या फरकावर थांबेल का? की एखादे अनपेक्षित नाव सर्वांनाच आश्चर्यचकित करेल? उत्तर लवकरच सापडणार आहे 9 सप्टेंबरला.
Maharashtra : मराठा समाजाला ‘सुधारित’ आसरा, ओबीसी आरक्षणाला ‘मिठीची खात्री’