मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल करत अमेरिकेच्या दबावाखाली झुकल्याचा आरोप केला आहे. रशियासारख्या पारंपरिक मित्रदेशाला दूर सारून पाकिस्तानला प्राधान्य दिलं जात असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.
भारतातील परराष्ट्र धोरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एकप्रकारचा राजकीय स्फोट घडवून आणला आहे. त्यांनी थेट आरोप केला आहे की, मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली झुकून पारंपरिक मैत्री संपवत आहे आणि त्यामुळे भारताचा स्वाभिमान व आर्थिक स्वायत्ततेला तडा जात आहे. त्या म्हणाल्या की, रशियासारखा जुना व विश्वासू मित्रदेश मोदी सरकारच्या धोरणामुळे दूर गेला, तर दुसरीकडे अमेरिका पाकिस्तानसोबत सवलतीत करार करत आहे.
ठाकूर यांनी सांगितलं की, भारताने रशियाकडून होणारी स्वस्त तेल खरेदी बंद केली, ही गोष्ट अमेरिकेच्या दबावात केली गेली. हे करताना मोदी सरकारने कोणत्याही दीर्घकालीन परिणामांचा विचार केला नाही. उलट, अमेरिका भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि अघोषित दंड लावत आहे, तर पाकिस्तानसाठी टॅरिफ फक्त 19 टक्के ठेवण्यात आलं आहे. ही गोष्ट आपल्या देशाच्या आर्थिक हिताला मारक आहे आणि हे अपयश सरकारचं नसून संपूर्ण देशाच्या भौगोलिक राजकारणासाठी एक मोठं संकट आहे, असं त्या म्हणाल्या.
Rahul Gandhi : बटन दाबलं लोकशाहीचं, पण परिणाम निघाला संशयाचा
धोरणाचं मोठा अपयश
रशिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या मोठा रेल्वे प्रकल्प उभारला जात आहे. हे लक्षात घेत ठाकूर यांनी असा आरोप केला की, भारताच्या दुर्लक्षामुळे आणि अमेरिकेच्या मागे लागण्याच्या धोरणामुळेच हे संबंध अशा वळणावर आले आहेत. रशिया जो वर्षानुवर्षे भारताचा खांद्याला खांदा लावणारा मित्र होता, तो आज पाकिस्तानसोबत भागीदारी करत आहे, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं अपयश आहे.
मोदी सरकार अमेरिकेला खूश ठेवण्यासाठी आपल्या पारंपरिक हितसंबंधांना विसरत आहे, असं सांगतानाच त्या म्हणाल्या, सरकारचं हे धोरण देशाच्या आत्मभिमानावर घाव घालणारं आहे. आज परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तान पुढे जात आहे आणि भारत मागे पडतो आहे. याच मुद्द्यावर ठाकूर यांनी एक अत्यंत घणाघाती सवाल उपस्थित केला की, अच्छे दिन कुठे आलेत? भारतात की पाकिस्तानात?
जनतेला बसणार फटका
यशोमती ठाकूर यांनी स्पष्टपणे म्हटले की, अशा चुकीच्या धोरणांचा आर्थिक फटका सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे. देशात महागाई वाढत असताना, जागतिक पातळीवर आपण मित्र हरवत आहोत आणि शत्रूंना सवलती देत आहोत, हे आपल्यासाठी धोक्याचं आहे.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून मोदी सरकार यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ विदेश दौरे किंवा भाषणं नसून, त्यामागे धोरणात्मक समज, मैत्रीपूर्ण राजकारण आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचं संतुलन आवश्यक असतं, असा टोला ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला लगावला.