राज्यामध्ये जी अंमली पदार्थांची तस्करी सुरू आहे, त्याच्या विरुद्ध देवाभाऊंनी मोठे हत्यार उपसले आहे. देवाभाऊंचे पोलीस जागोजागी कारवाई करत आहे. परंतु अकोल्यामध्ये भाजपचा पदाधिकारीच अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सापडला आहे. सरचिटणीसांनी केलेल्या हट्टामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पक्षाची शिस्त आणि आरएसएसच्या संस्काराला मोर्णा नदीमध्ये पार बुडवून टाकल्याचे हे प्रतिकार आहे.
महाराष्ट्रातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य प्रशासन आणि पोलिसांनी सातत्याने कारवाई केली असली तरी, या अवैध व्यवसायावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. अनेक आरोपींना अटक करूनही अमली पदार्थाची तस्करी थांबलेली दिसत नाही. याच परिस्थितीत एक नवे वळण घेत, अकोला जिल्ह्यात राजकारणी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी, अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत शहरातील दोन ठिकाणी कारवाई केली गेली. यामध्ये एकूण 19.5 किलो भांग जप्त करण्यात आली.
सोबतच दोन आरोपींना ताब्यात घेतले गेले. ही कारवाई सिटी कोतवाली पोलिसांनी केली असून, आरोपींमध्ये कालीचरण अजय अवस्थी आणि ऋषिकेश देवसिंग चव्हाण यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या 19.5 किलो भांगची अंदाजे किंमत 18 हजार 525 आहे. पहिल्या कारवाईत कालीचरण अवस्थी याच्याकडून 11.1 किलो भांग जप्त करण्यात आली. ज्याची किंमत 10 हजार 545 होती. दुसऱ्या कारवाईत, ऋषिकेश चव्हाण याच्याकडून 8.4 किलो भांग जप्त केली गेली. ज्याची किंमत 7 हजार 980 आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये एका मोठ्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे.
Ashish Jaiswal : मिथेनचे राक्षस रोखण्यासाठी जयस्वालांचं पर्यावरण कवच
विरोधकांचे कडवट आरोप
संबंधित व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करीत असताना देखील त्याला भाजपमध्ये स्थान देण्यात आले. भाजपच्या एका सरचिटणीसाच्या हट्टासाठी संघ आणि पक्षाची शिस्त विकून अकोला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. नियुक्ती होत नाही तोच काही दिवसातच संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. त्यामुळे अकोल्यातील भाजप गुन्हेगारांसाठी वॉशिंग मशीन झाल्याचे आता बोलले जात आहे. सध्या अकोला भाजपमध्ये हिटलरशाही सुरू आहे. संघाच्या स्वयंसेवकांचा आणि प्रचारकांचा अपमान करायचा असा क्रम सुरू आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अक्षरशः गरळ ओकली जात आहे.
सर्व मंडळी ब्राह्मण असल्याने अकोल्यातील अनेक ब्राम्हण भाजप कार्यकर्त्यांना हिणवले जात आहे. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे देखील ब्राह्मण समाजाचे होते. त्यांच्या निधनानंतर शर्मा यांच्या अनेक कार्यकर्त्यांना संपला तुमचा मनुवाद, गया तुम्हारा लालाजी अशा शब्दात अपमान केला जात आहे. अनेक कार्यकर्ते यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करून आहेत. त्यानंतरही भाजपच्या वरिष्ठांकडून का दुर्लक्ष करण्यात येत आहे ही बाब आश्चर्यकारक आहे. भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून या संदर्भामध्ये ‘पैसा बोलता है’ हे अभिनेता कादर खानचे गाणे आठवा, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अकोल्यामध्ये भाजप काही नेत्यांच्या पायाखाली लोळण घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
Parinay Fuke : जनतेचा विश्वास ठरेल भाजपच्या महापालिका यशाचे गुपित