बुद्धिबळाच्या पटावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या दिव्या देशमुखच्या देदीप्यमान यशानंतर महाराष्ट्र शासनाने क्रीडा धोरणात महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी शासन आता अधिक ठोस आणि गतिमान कार्यवाहीच्या तयारीत आहे.
खेळाच्या पटावर लढणारी चाल, आता धोरणांच्या मांडणीवर प्रभाव टाकत आहे. एकेकाळी फक्त मैदानापुरता सीमित असलेला खेळ, आज शासनाच्या धोरणात्मक निर्णयांचा केंद्रबिंदू बनला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे, जागतिक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखच्या सन्मानप्रसंगी झालेला ऐतिहासिक निर्णय. केवळ तिचे अभिनंदन नव्हे, तर संपूर्ण राज्यात दर्जेदार आणि अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा नवा निर्धार.
नागपूरमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या नागरिक सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याला 3 कोटी रुपयांचे बक्षीस देत तिच्या यशाला सलाम केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, जागतिक पातळीवर यश मिळवायचे असेल, तर तंत्रशुद्ध प्रशिक्षण, सकस आहार आणि परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यासारख्या बाबी अनिवार्य आहेत. या सर्व गोष्टींवर सरकार अधिक गतीने आणि ठोसपणे काम करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
वय लहान, कमाल मोठी
दिव्या देशमुखच्या या विजयाने चीनसारख्या बुद्धिबळात वर्चस्व असलेल्या देशांनाही ‘शह’ दिला आहे. कोनेरू हम्पीसोबत मिळून तिने जागतिक पटलावर भारताची ताकद दाखवली. अवघ्या 19 वयात ती बुद्धिबळ विश्वविजेती ठरली, ही बाब फक्त क्रीडाविश्वासाठी नव्हे, तर संपूर्ण देशातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम नव्हे, तर महाराष्ट्राच्या क्रीडा योजनेतील एक निर्णायक टप्पा ठरला.
मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना अधोरेखित केले की, दिव्याने वयाच्या लहान वयात एकाग्रता आणि सजगतेच्या जोरावर हे यश मिळवलं. ही प्रेरणा इतर हजारो मुला-मुलींसाठी दीपस्तंभ ठरेल. यापुढे केवळ पुरस्कार नव्हे, तर संपूर्ण खेळ संरचना, धोरण आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहणार आहे.
संधी आणि आधार
दिव्याच्या या यशाचा अर्थ आता एकट्या तिच्या विजयापुरता मर्यादित नाही. ही एक चाल आहे, जी महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या धोरणांमध्ये खेळली आहे. एक अशी चाल, जी भविष्यातील हजारो खेळाडूंसाठी अधिकाधिक संधी आणि आधार निर्माण करणार आहे. बुद्धिबळाच्या पटावरून उगम पावलेली ही दिव्यता, आता सरकारच्या क्रीडा दृष्टीकोनाचा केंद्रबिंदू बनली आहे.
जागतिक बुद्धीबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने आपले मनोगत व्यक्त केले. राज्य शासनाचे बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी नागपूरकरांचे आभार मानते. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार असल्याचे तिने सांगितले.
कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, संदीप जोशी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सोहळा अधिक भव्य आणि प्रभावी ठरला.