महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार तंबी देऊनही अनेक मंत्री आणि आमदार तोंडावर ताबा ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. सुरुवात झाली ती माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याने. ज्यामुळे त्यांना कृषीमंत्री पद गमवावे लागले. मात्र, त्यानंतरही मंत्र्यांची भाषणांची धार कमी झालेली नाही. नुकतेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती. त्या प्रकरणाची धग थांबण्याआधीच आता परभणीच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने चर्चेला नवे खाद्य मिळाले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ग्रामसेवकाला कानाखाली मारीन अशी थेट धमकी दिली आणि याचा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. कार्यक्रम जिंतूर तालुक्यातील बोरी गावात झाला होता. यात मेघना बोर्डीकर म्हणताना दिसतात, असे कुणाचे काम केले ना तर याद राखा कानाखाली मारीन. आताच बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायची नाही. या प्रकरणावर आता काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
Nagpur : भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी वाजवली मंडळ यात्रेची तुतारी
अर्धवट माहितीची धामधूम
वडेट्टीवार यांनी सरकारला थेट सवाल केला, एक राज्यमंत्री सरकारी कार्यक्रमात ग्रामसेवकाला अशा प्रकारे धमकी देऊ शकतात का? हे कोणत्या अधिकारात? त्यांच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र फडणवीस आपण जे सज्जन मंत्री निवडले आहेत, त्यांच्यामुळे ना फक्त आपल्या मंत्रिमंडळाची इज्जत जातेय, तर महाराष्ट्राची देखील बेअब्रू होत आहे. वादाचा भडका उडाल्यानंतर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बोरी येथील विधवा व मोलमजुरी करणाऱ्या महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी त्या कार्यक्रमात गेले होते. अनेक महिलांनी तक्रार केली की संबंधित ग्रामसेवक त्यांच्याकडून पैसे मागत होता, त्यांना त्रास देत होता.
तक्रारी असूनही तो दाद देत नव्हता. त्यामुळे मी पालकमंत्री म्हणून त्याला समज दिली. बोर्डीकर म्हणाल्या की, मी त्या महिलांची बाजू घेतली. त्या क्षणी मला जे योग्य वाटले, ते मी बोलले. मात्र, कुणालाही धमकावण्याचा हेतू नव्हता. हे पूर्ण प्रकरण अर्धवट माहितीच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचवले गेले. राजकारणातील वादग्रस्त विधाने आता केवळ चर्चेपुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर त्याचे परिणाम राजकीय संस्कृतीवर आणि लोकशाही मूल्यांवरही होत आहेत. कोणताही सरकारी अधिकारी असो वा ग्रामसेवक, त्याच्याशी वागण्याचा एक नियम आहे. लोकप्रतिनिधींनी भाषेचा संयम पाळण्याची अपेक्षा असते.
Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन