मोर्शीतील शासकीय कार्यक्रमात कर्जमाफीवरून बावनकुळे यांच्या विधानाने वातावरण तापलं. यावर आमदार बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या वेदना नौटंकी नाहीत, असा आक्रमक पलटवार केला. शासकीय मंचावर राजकारण केल्याबद्दल त्यांनी मंत्र्यांना खरमरीत शब्दांत सुनावलं.
मोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग उफाळून आलं आहे. कर्जमाफीसंदर्भातील आंदोलनांकडे अप्रत्यक्षपणे नाटक म्हणून पाहिल्याचे संकेत देणाऱ्या त्यांच्या विधानावर प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले होते की, कर्जमाफीवरून आंदोलनं करायची, नाटकं करायची, पण दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधन एक हजार 500वरून 2 हजार 500 रुपये केलंय. ज्या शेतकऱ्यांना खरोखर गरज आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळणार. काही लोक इथे केवळ नौटंकी करत आहेत. या भाष्याने बच्चू कडू संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या खास शैलीत या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा
जोरदार घणाघात
बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नींचा आक्रोश आहे, त्यांच्या घरातील चूल विझली आहे. जेव्हा अशा स्त्रिया रस्त्यावर येतात, तेव्हा त्याला नौटंकी म्हणणं, हे केवळ असंवेदनशीलपणाचं नव्हे तर शेतकऱ्यांच्या रक्ताश्रूंचं अपमान आहे, असे ते म्हणाले.
कडू पुढे म्हणाले, बावनकुळे मंत्री झाले, त्यामुळे त्यांचं पोट भरलं असेल. पण अजूनही शेतकऱ्यांच्या ताटात अन्न नाही. आम्ही जे बोलतो ते आमच्या हक्कासाठी बोलतो. हे पैसे सरकारचे नाहीत, आमचे आहेत, आमच्या श्रमांचे आहेत. आम्हाला शेतात राबून मिळालेले आहेत. तुम्ही जर एखादा सवलतीचा निर्णय घेतलात, तर तो कृपादान नव्हे, हक्क आहे, हे लक्षात ठेवा.
बोचरी टीका
शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण देण्यावरूनही बच्चू कडू यांनी टोकाची टीका केली. जर तुम्हाला राजकीय भाषण करायचं असेल, तर स्वतःची सभा घ्या, स्वतःचे पैसे खर्च करा. शासकीय व्यासपीठावरून राजकारण करताय, हे योग्य नाही. एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात स्थानिक आमदारांना बोलायला वेळ दिला जात नाही आणि तुम्ही मात्र विरोधकांवर टीका करता, हे लाजिरवाणं आहे.
रामदेव बाबांच्या कारखान्याचा विषय महत्त्वाचा ठरतो आणि संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांवर मौन का? भाव किती मिळणार हे जाहीर करा ना. शेतकऱ्यांच्या संत्र्याचे काय? त्यांची फळं खराब होतायत, बाजार मिळत नाही, आणि सरकार गप्प का? असेही सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केले. तसेच धर्माच्या नावावर सुरू असलेली अस्थिरता आणि गोंधळ थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला. धर्माच्या नावाने सुरू असलेली गुंडागर्दी आता थांबणार आहे. आमची नौटंकी म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचे सातबारा कोरे करून घेतले, ती खरी नौटंकी होती, असा दणका बच्चू कडूंनी दिला.
सरकारला टोला
कर्जमाफीसाठी एकत्र येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आवाजाला नौटंकी म्हटले जात असेल, तर ती लोकशाहीची विटंबना आहे, असेही बच्चू कडूंनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात की दोन वेळा कर्जमाफी मिळणार नाही. मग जे आधी वंचित राहिले त्यांचे काय? बोलताना अभ्यास असायला हवा, असा टोला बच्चू कडू यांनी थेट सरकारलाही लगावला.
या संपूर्ण घडामोडीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप न करता बच्चू कडूंनी केलेली ही प्रतिक्रिया राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली ‘प्रहार’ शैली दाखवली आहे. यामुळे आगामी राजकीय वातावरणातही या मुद्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.