लोकाभिमुख प्रशासनासाठी खुर्चीतून उठून जनतेत जा,असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिला. तक्रारी मंत्रालयात पोहोचण्याआधीच गावातच सोडवा, असा संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
लोकाभिमुख प्रशासन हवं असेल, तर फाईलांमध्ये नव्हे लोकांमध्ये उतरा, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना जणू सावध केलं. AC ऑफिसच्या गारव्यात घेतले जाणारे निर्णय आता पुरेसे नाहीत, असं स्पष्ट करत बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिला आहे. प्रत्येक आठवड्यातून किमान एक शुक्रवार, त्यांनी महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये स्वतः जाऊन भेटी द्याव्यात. तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, प्रांत कार्यालय अशा साखळीतील प्रत्येक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधावा. आपल्या हद्दीतील गावागावात जावं आणि लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असं त्यांनी बजावलं आहे.
बावनकुळे म्हणाले की, प्रशासन लोकाभिमुख असावं ही आपली सततची मागणी आहे. पण केवळ घोषणा देऊन ते साध्य होत नाही. जेव्हा एकही अर्ज महसूल मंत्र्यांकडे येणार नाही, जेव्हा एकही तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात पोहचणार नाही, तोच खरा लोकाभिमुख प्रशासनाचा दिवस असेल, असे सांगताना त्यांनी प्रशासनातील अनावश्यक कचखाऊपणावरही अप्रत्यक्ष बोट ठेवलं.
Sanjay Khodke : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आमदारांची तरुणांसाठी मोटिवेशनल क्लास
तक्रारी नव्हे समाधान यावं ऐकू
महसूल खात्याचं भविष्यातील स्वप्न उभं करताना त्यांनी एक नवा दृष्टिकोनही मांडला. पुढील तीन वर्षांत महसूल विभाग असा असावा की, कुठलाही शेतकरी किंवा नागरिक मंत्र्यांना भेटेल, पण तक्रार करण्यासाठी नाही, समाधान व्यक्त करण्यासाठी. प्रशासन असं असावं की माणसांनी सरकारकडे तक्रार न करता समाधान सांगावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही केवळ अपेक्षा नाही तर त्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठी अस्मितेवरून सध्या गाजत असलेल्या वादावरही बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, खासदार दुबे यांना महाराष्ट्राचं भान नाही. कोणी कोणाचं राजकारण संपवू शकत नाही. प्रत्येकाचा एक स्वतंत्र विचारधारा आणि अजेंडा असतो. हे राजकारण संपवण्याचे नाही, तर एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचे दिवस आहेत.
बावनकुळे यांचे हे वक्तव्य केवळ आदेश नाहीत, तर महसूल खात्याच्या पुनर्घटनाचे शिल्प आहेत. ‘फाईलपेक्षा माणूस महत्त्वाचा’ हे ब्रीद घेऊन महसूल खातं आता नव्या युगात पाऊल ठेवताना दिसत आहे. प्रशासनाच्या खुर्चीपासून जनतेच्या दारीपर्यंतचा हा प्रवास, आता किती प्रभावी ठरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण एक मात्र नक्की की, ‘जनतेत जा आणि संवाद साधा’ हा मंत्र सध्या महसूल मंत्रालयात जोरात घुमतोय.