महाराष्ट्र

Amravati : नौटंकी म्हणणाऱ्या महसूल मंत्र्यांचा प्रहारने केला जाहीर निषेध

Chandrashekhar Bawankule : चपलांनी उमटला शेतकऱ्यांचा आवाज

Author

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी वक्तव्याला मोर्शीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार निषेध केला.

अमरावतीच्या मोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांवर बोलताना आंदोलनांना नौटंकी असे संबोधले. त्यांच्या या शब्दांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आणि त्याचा जोरदार निषेध प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आला आहे. बावनकुळे म्हणाले होते, कर्जमाफीसाठी नाटके केली जात आहेत. काही लोक फक्त नौटंकी करतात. ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळेल.

बावनकुळे यांनी दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधन 1 हजार 500 वरून 2 हजार 500 रुपये केले असल्याचेही नमूद केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे.बावनकुळे यांच्या वक्तव्याला शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली. मोर्शी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (४ ऑगस्ट रोजी) कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी मिरच्या देखील जाळल्या. हे आंदोलन केवळ संतापाचे नव्हते, तर एका सत्ताधारी मंत्र्याच्या टिंगल-टवाळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न होता.

Chandrashekhar Bawankule : राजकारण संपवण्याऐवजी विकासात द्या लक्ष

शेतकऱ्यांच्या अस्मितेचा अपमान

कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांच्या संघर्षाला नौटंकी म्हणणे म्हणजे त्यांच्या अस्मितेचा अपमान आहे. सरकार जर अशा शब्दांचा वापर करत असेल, तर ते शेतकरीविरोधी आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे संकेतही देण्यात आले. भाजपने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा, कोरा, कोरा असा गजर केला होता. मात्र आता शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख विचारली की, त्यांना मिरची झोंबते आणि आंदोलनांना नौटंकी म्हणत टर उडवली जाते, असा घणाघात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांचा मुद्दा हा केवळ एका वर्गाचा नसून, संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जितू दुधाने, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे, संपर्क प्रमुख गोलू पाटील यांच्यासह महिलांचाही सक्रिय सहभाग होता. मंजुषा बोडखे, अलका शहाणे, शुभांगी वाटाणे, पद्मा मेतकर, ललिता धूर्वे या महिला नेत्या आंदोलनाच्या अग्रभागी होत्या. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांना मंत्रिमंडळातून हटकून काढावे. तसेच, कर्जमाफी आणि हमीभावावर तात्काळ आणि स्पष्ट तारीख जाहीर करावी. ही लढाई फक्त कर्जमाफीसाठी नसून, शेतकऱ्याच्या अस्मितेसाठी आहे, असे आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितले. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी आले आहे. एका वक्तव्याने पेटलेली ही आग किती लांब जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supreme Court : राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची खडसावणारी तंबी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!