मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या निष्क्रियतेविरोधात आमदार संदीप जोशी यांनी थेट मनपा आयुक्तांना इशारा देत रोष व्यक्त केला आहे.
राजकारणात मैत्री असली तरी जनतेची तडफड पाहून कोणीही गप्प बसू शकत नाही. जेव्हा ती मैत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या विश्वासातील आमदार संदीप जोशी यांच्यातली असेल, तेव्हा उद्रेक हा केवळ राजकीय नसून सामाजिकही ठरतो. नागपूर दक्षिण-पश्चिम – मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभेद्य मतदारसंघ. जिथे विकास ही ओळख मानली जाते. तिथे गेल्या पंधरवड्यापासून नळांमधून दुर्गंधीयुक्त, आरोग्य धोक्यात आणणारे, चक्क घाण पाणी नागरिकांच्या गळ्यात उतरवलं जातंय. याच प्रश्नावरून आता संदीप जोशी लोकहितासाठी मैदानात उतरले आहेत.
जोशी आणि फडणवीस यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत. फडणवीसांनी ज्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना नगरसेवक ते आमदार केलं आणि आपला मानद सचिवही केलं. तेच संदीप जोशी आता त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांसाठी मनपावर संतापले आहेत. त्यांनी केवळ आरोप केला नाही, तर थेट मनपा आयुक्तांना पत्र पाठवून उघड इशारा देऊन टाकला. जोशींनी म्हटले, या तक्रारींची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही आयुक्त कार्यालयात येऊन जनतेचा राग तुमच्या समोर ठेऊ. जनतेशी झटून जोशी फडणवीसांच्या विश्वासावर खरे उतरत आहेत.
Supreme Court : गुंता सुटला; प्रभाग रचना बदलणार, मतांचा खेळ रंगणार
प्रशासनाचं अपयश
दीनदयाल नगर आणि स्वावलंबी नगर या विभागातील नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय. रोज सकाळी उठून मिळणाऱ्या पाण्यात गढूळपणा, दुर्गंधी, आणि अशुद्धतेचा भसका येतोय. कुठे आरोग्याचा प्रश्न, कुठे लहान मुलांचे आजार, कुठे म्हाताऱ्यांची अस्वस्थता आणि त्यावर महापालिका प्रशासनाचं सौम्य मौन. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जर ही अवस्था असेल, तर शहराच्या इतर भागांचं काय? जोशींचा हा सवाल फक्त शब्द नाही, तर प्रशासनाच्या गालावर बसलेली सणसणीत चपराक आहे. सोशल मीडियावर देखील नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. अनेकांनी ‘हे पाणी आम्हाला का प्यायला लावता?’ असा सवाल केलाय.
जोशी यांनी आक्रमक शैलीत पत्रात म्हटले की, तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका. हा शब्दशः इशारा नव्हे, तर प्रशासनाच्या सडेल व्यवस्थापनावर वीजप्रहार आहे. जोशींच्या निवेदनातील संताप स्पष्टपणे दर्शवतो की, या प्रश्नावर कोणताही राजकीय सौजन्याचा बुरखा आता उरणार नाही. गुरुवारी, 7 ऑगस्ट रोजी जर समस्या सुटली नाही, तर नागरिकांना घेऊन थेट आयुक्त कार्यालयावर धडक देणार. जोशींचा हा शब्द म्हणजे रणभेरी. आता फक्त शब्द नव्हे, तर कृतीचा इशारा आहे. यापुढे काय होईल, ते प्रशासनाच्या पुढील निर्णयांवर अवलंबून आहे.
Anil Deshmukh : शासनाचा पैसे करदात्यांचा, नाही कुणाच्या बापाचा
भविष्याची किनार
संदीप जोशी हे आज फडणवीस यांचे केवळ सहकारी नाहीत, तर त्यांच्या गडाचे तारणहार ठरत आहेत. मतदारसंघातील जनतेच्या हक्कासाठी जोशी रस्त्यावर उतरत असतील, तर हे नातं केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जबाबदारीचं प्रतीक ठरतं. जोशी जे एकेकाळी फडणवीस यांचे मानद सचिव होते. ते जोशी आता फडणवीस यांची ढाल आणि तलवार दोन्ही झाले आहेत. हे नातं जर सत्तेत असणाऱ्यांना ताठ ठेवत असेल, तर अशी लोकशाही आदर्श ठरते.
या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली की, नागपूरमध्ये पाणी फक्त आरोग्याचा नाही, तर नेतृत्वाच्या जबाबदारीचाही प्रश्न बनला आहे. फडणवीसांच्या गडात ही अवस्था असेल, तर ‘राज्याचा चेहरा’ म्हणवणाऱ्या नागपूरची प्रतिमा कुठे जाईल? आता जनता उत्तर मागतेय आणि संदीप जोशी यांनी आवाज दुमदुमायला सुरुवात केली आहे.