महाराष्ट्र

Bhandara : स्मार्ट मीटर की स्मार्ट सापळा? ग्राहकांना विजेचा झटका

MSEDCL : एकीकडे डिजिटल, तर दुसरीकडे ग्राहक आर्थिक अंधारात

Author

धारगावमध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विजेच्या बिलांमध्ये प्रचंड वाढ झाली असून नागरिक हवालदिल झाले आहेत. परवानगीशिवाय जबरदस्तीने लावण्यात आलेल्या मीटरमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेले ग्राहक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.

डिजिटल इंडियाच्या झगमगाटात सामान्य वीज ग्राहकांच्या खिशात मात्र अंधार दाटत आहे, असे म्हणावे लागेल. महावितरणकडून जुन्या वीजमीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. पण या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर धारगाव परिसरातील नागरिकांना विजेच्या बिलांनी अक्षरशः धक्का दिला आहे. दुप्पट-तिप्पट वाढलेली वीजबिलं पाहून नागरिक हवालदिल झाले आहेत. गोरगरिबांच्या घरात आर्थिक अडचणींचे वादळ निर्माण झाले आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून धारगाव परिसरातील घरांमध्ये महावितरणने खासगी कंत्राटदारांमार्फत स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली. यामध्ये अनेक घरांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता, नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने हे मीटर लावण्यात आले. महावितरणने हे मीटर मोफत असून, नंतर ते खरेदी करावे लागतील असे सांगत काही नागरिकांना दबाव टाकून मीटर बसवले. काही घरांमध्ये तर घरात कोणी नसताना परवानगीशिवाय मीटर बसवण्यात आले.

Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांना उत्तर देणे माझ्या लेव्हलचे नाही

मोठा तणाव

या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलात मोठी वाढ झाली आहे. ज्यांना यापूर्वी 300 ते 500 रुपये बिल येत होते, त्यांना आता एक हजार 200 ते एक हजार 500 रुपयांपर्यंत बिल येऊ लागले आहे. यामुळे घरगुती खर्चात मोठा तणाव निर्माण झाला आहे. महावितरणकडून म्हटले जाते की, स्मार्ट मीटर अधिक अचूक वाचन करून खरे वीजबिल देतात. मात्र, धारगावातील परिस्थिती पाहता या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.

या प्रकाराचा सर्वात धक्कादायक अनुभव पलाडी गावातील विशांत शामकुंवर यांना आला. त्यांच्या घरीही स्मार्ट मीटर बसवण्यात आले. त्यांनी तात्काळ विरोध करून जुनं मीटर परत बसवून घेतलं. पण तरीही त्यांना चक्क 50 हजार रुपयांचं बिल आले. याआधी त्यांना दरमहा 900 रुपयांच्या आसपास बिल यायचं. आता अचानक एवढं मोठं बिल येणं म्हणजे कुठल्याशा घातक गोंधळाची स्पष्ट चिन्हं आहेत. या घटनेनंतर महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.

महावितरणकडून प्रतिसाद नाही

ग्राहकांनी महावितरणच्या या कारभारावर जोरदार आक्षेप घेतला आहे. अनेकांनी सांगितलं की, नवीन टीओडी (Time of Day) मीटर पद्धतीची कुठलीही माहिती दिली जात नाही. यामुळं ग्राहकांना कोणत्या वेळेस किती दराने वीज आकारली जाते, हेच समजत नाही. त्यातच वाढीव बिलावर तक्रार केली तरी महावितरणकडून काहीही प्रतिसाद दिला जात नाही, ही तक्रार सामान्य झाली आहे.

धारगावातील काही नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत. पुरुषोत्तम ठवकर यांनी सांगितलं की, पूर्वी माझं बिल 300 रुपये यायचं, आता ते अचानक एक हजार 500 रुपयांवर गेलं. हे मीटर काढून जुना मीटर लावावा. विजय डोंगरवार म्हणतात, दोन महिन्यांपूर्वी मीटर बसवल्यानंतर माझं बिल 500 रुपयांवरून थेट एक हजार 500 रुपयांपर्यंत वाढलं. रविशंकर वैद्य यांनी तर स्पष्ट सांगितलं की, बिलामध्ये अनपेक्षित वाढ झाली असून घरखर्चावर परिणाम झाला आहे.

Sandip Joshi : नळातून गढूळतेची धार अन् जोशी बनले देवाभाऊंची तलवार 

आक्रोश वाढला

महावितरणच्या स्मार्ट मीटरबाबतचे दावे आता लोकांना फसवे वाटू लागले आहेत. वीज वापराच्या वेळेनुसार बिलिंग करणं हे खरे असले, तरी ग्राहकांना ही प्रणाली न समजल्याने आणि वाढीव बिलांनी त्रस्त झाल्याने आक्रोश सुरू झाला आहे. धारगाव, पलाडी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, हे स्मार्ट मीटर हटवून पूर्वीप्रमाणे पारंपरिक मीटरच लावावेत. शिवाय, महावितरणने तक्रारींचे निवारण तात्काळ करावे आणि वाढीव बिलांचा फेरआढावा घ्यावा.

डिजिटल युगात वीजमापन अचूक असणं गरजेचं आहे, मात्र त्यासाठी पारदर्शक प्रक्रिया आणि ग्राहकांची संमती आवश्यक आहे. बळजबरी, माहितीचा अभाव आणि तक्रारींच्या दुर्लक्षामुळे महावितरणकडून ‘स्मार्ट’ मीटरच्या नावाने ‘स्मार्ट लूट’ सुरू असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. हे थांबवायचं असेल तर महावितरणने तत्काळ उत्तरं द्यावी लागतील… अन्यथा हा विरोध उग्ररूप धारण करणार, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!