नागपुरात एका पार्टीत धमालऐवजी दहशत निर्माण झाली, जेव्हा काही तरुणांनी पोलिसांना थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने धमकी दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेत खुद्द बावनकुळे यांनीच कारवाईचे आदेश दिले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
फ्रेंडशिप डेसारख्या सौहार्दाच्या दिवशी, नागपूरच्या जुनी कामठी परिसरात मात्र एक पार्टी थेट पोलिसांत आणि गुन्हेगारी प्रकरणात परिवर्तित झाली. ‘फ्रेंड्स अँड बियाँड’ या नावाने रविवारी 3 ऑगस्ट रोजी हॉटेल ईडन ग्रीन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, नियम धाब्यावर बसवले गेले. पोलिसांनी स्पष्ट केलेल्या अटी व शर्तींचा सर्रास भंग होत होता. याच दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि परिस्थिती बिघडू लागली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पार्टी थांबवली आणि संगीत बंद केले.
मात्र यानंतरच नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक असलेल्या वेदांत छाबरिया, रितेश चंद्रशेखर भदाडे आणि आकाश बनमाली यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना धमकावण्यास सुरुवात केली. मी थेट बावनकुळे सरांशी बोलतो, अशी उर्मट भाषा वापरत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित व्यक्तींनी उन्मत्तपणाचं प्रदर्शन करत पोलिसांच्या अधिकारांनाही धक्का दिला.
Vijay Wadettiwar : न्यायाच्या खुर्चीत हुकूमशाहीचा खेळ होऊ नये
धमकी देणे भोवले
या प्रकाराचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रकरण थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पर्यंत पोहोचले. या व्हिडीओतील मजकूर आणि भाषा पाहिल्यानंतर बावनकुळे यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर, त्यांनी स्वतः रीतसर लेखी तक्रारही दाखल करून कायदा हातात घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सध्या चौकशी सुरु आहे. यासंदर्भात बोलताना डीसीपी निकेतन कदम म्हणाले की, मी स्वतः हा व्हिडीओ पाहिला आहे. पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अत्यंत गंभीर बाब आहे. कोणीही मंत्र्यांच्या नावाने धमकी देऊन कायद्यापासून वाचू शकत नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
न्यायाचं दार
या घटनेनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की, राजकीय नावांच्या आड लपून कायदा मोडणाऱ्या आणि अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांसाठी आता प्रशासन अधिक सजग झालं आहे. पोलिसांवर दबाव टाकणे, नियम धाब्यावर बसवणे आणि गुंडगिरी करून सामाजिक वातावरण बिघडवणे यांना यापुढे कोणतीही गय दिली जाणार नाही. फ्रेंडशिप डेच्या नावाखाली रंगलेल्या पार्टीने आता न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग पकडला आहे. मंत्र्यांचं नाव घेणाऱ्यांना आता न्यायाच्या दारात उभं राहावं लागणार आहे.