कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. कबूतरांच्या छत्राखाली आरोग्य, नियोजन आणि प्रशासनाच्या अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मुंबईतील दादर परिसरात सुरू असलेल्या कबूतरखाना वादावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा या वादात सक्रियपणे उतरत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर जोरदार प्रहार करत सत्ताधाऱ्यांचा खडा जाब विचारला आहे. सपकाळ यांनी थेट अशी मागणी केली की, लोढा आणि अदानी यांच्याकडे मुंबईत प्रचंड जमीन आणि इमारती आहेत. मग त्यांनीच त्यांच्या बांधकामांमध्ये कबूतरांसाठी एक ‘आदर्श कबूतरखाना’ उभारावा आणि करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा.
सपकाळ म्हणाले की, कबूतरांच्या विष्ठेमुळे अनेक नागरिकांना फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याची नोंद न्यायालयाने घेतली आहे. परिणामी, न्यायालयाने कबूतरखाने हटवण्याचे आदेश दिले. परंतु काही धार्मिक संस्था त्याला विरोध करत आहेत आणि सरकार त्यांच्या मागे उभं राहत आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या मानणाऱ्या सरकारचे धोरण म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर, असा चिमटा सपकाळ यांनी काढला.
Vijay Wadettiwar : व्हीव्हीपॅट नाही, तर बॅलेट पेपरवर घ्या निवडणूक
बेरोजगारीचा आलेख
सध्याच्या शासनाचे मुख्य धोरण म्हणजे जनतेच्या खरी व्यथा झाकून, असललेल्या धार्मिक-सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून भरकटवणे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात शेतकरी अडचणीत आहेत, बेरोजगारीचा आलेख वाढतोय, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. पण सरकार कबूतरांच्या पंखांमध्ये अडकून बसलंय, असे ते म्हणाले.
दादर कबूतरखान्यावर झालेल्या आंदोलनात बाहेरच्या लोकांचा सहभाग असल्याचा सरकारचा दावा देखील सपकाळ यांनी फेटाळला. राज्यभर कुठेही काही गडबड झाली की ‘बाहेरचे लोक होते’ हे उत्तर सरकारकडून आपोआप येते. ही जुनी स्क्रिप्ट आता जनतेला पाठ झाली आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या अपयश झाकण्याच्या पद्धतीवरही टीका केली.
बदलीवरून वादळ
यानंतर त्यांनी आणखी एक स्फोटक मुद्दा उचलून धरला, तो म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सुरु असलेले ‘गँगवॉर’. बेस्ट प्रशासनाच्या अतिरिक्त कारभारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली, तर त्याच पदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची नियुक्ती केली. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, हे सरकार नव्हे, तर ‘डबल इंजिन टोळी सरकार’ आहे. एकाच पदासाठी एकाच वेळी दोन वेगवेगळे अधिकारी नियुक्त करणं म्हणजे सत्ता संघर्षाच्या चिघळलेल्या अवस्थेचा पुरावा आहे.
Bacchu Kadu : लोकशाहीच्या शाळा बंद करा अन् मतदान भाजपच्या वर्गातच घ्या
सपकाळ म्हणाले की, मलाईदार पदावर ‘आपलाच माणूस’ बसवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता इतकी वाढली आहे की, सरकार की गँगवार? हा प्रश्न जनतेला पडतो आहे. ही स्थिती म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात चाललेली खुर्च्यांची झुंबड असून, त्यात जनतेचा हित विसरला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शेवटी, सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकार या सगळ्या मुद्द्यांमागे स्वतःचा अपयश झाकत आहे. प्रत्येकवेळी धार्मिक, भावनिक किंवा संवेदनशील मुद्द्यांचा वापर करून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांपासून दूर वळवणं हे या सरकारचं सगळ्यात मोठं कौशल्य बनलं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळेच त्यांनी अखेरच्या शब्दांत टोचणारी मागणी मांडली, जर खरंच कबूतरखानाच करुणेचा सर्वोच्च आदर्श असेल, तर मग लोढा आणि अदानी यांच्या मुंबईतील टोलेजंग इमारतीच त्याचा आधार ठरू द्या.