गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या कार्याची स्तुती केली.
ओबीसी समाजासाठी सातत्याने लढणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवा विश्वासार्ह चेहरा बनलेल्या माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे कार्य अखेर राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. ओबीसी महासंघाचे पुत्र समजले जाणारे डॉ. फुके हे नेहमीच आपल्या प्रयत्नांतून ओबीसी संघासाठी केलेली मेहनत सिद्ध करत असतात. यंदाही तेच होतांना दिसत आहे. नुकतेच ७ ऑगस्ट रोजी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. फुके यांची तुलना थेट मुख्यमंत्र्यांशी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे. या भव्य अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रतिनिधींमध्ये एकच नाव वारंवार दुमदुमत होते, ते म्हणजे डॉ. परिणय फुके. महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, केलेला पाठपुरावा आणि सातत्याने केलेल्या संघर्षाचे कौतुक सर्वत्र होत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात एक खास किस्सा सांगितला. बबनराव तायवाडे यांनी डॉ. फुके यांना मंत्री बनवण्याची विनंती केली होती. त्यावर हसत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोक तर त्यांना मुख्यमंत्री समजतात. माझ्यासोबत राहतात म्हणून सर्वांनाच माहीत आहे की गुरुकिल्ली त्यांच्याकडेच आहे. तुम्ही त्यांचे डीमोशन करायला निघालात का?’ हा विनोदी परंतु सूचक उल्लेख अधिवेशनाच्या रंगतदार क्षणांपैकी एक ठरला.
Prakash Ambedkar : मोदींच्या ट्रम्प मंत्राने, देशाचे आर्थिक तंत्र ढवळले
भविष्यात राजकीय संधी
फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले की, भविष्यात डॉ. फुके यांच्या राजकीय योगदानाचा नक्कीच विचार केला जाईल. गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी डॉ. फुके सातत्याने लढा देत आहेत. हॉस्टेल योजना, परदेशी शिष्यवृत्ती, राजकीय आरक्षण या सर्व महत्त्वाच्या बाबींमध्ये त्यांच्या पाठपुराव्यामुळे निर्णय केवळ कागदावर राहिले नाहीत, तर प्रत्यक्षात अंमलात आले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, जे निर्णय झाले, त्याचे श्रेय आमचे असले, तरी हे निर्णय घडवून आणण्यामागे डॉ. परिणय फुके यांचा मोठा वाटा आहे. विशेषतः ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल योजना आणि परदेशी शिष्यवृत्ती ही महत्त्वाची पावलं त्यांच्याच धडपडीचा परिणाम आहेत. फडणवीसांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, मी केवळ राजकारणासाठी नाही, तर श्रद्धेने ओबीसी समाजासोबत उभा आहे.
अनेक वेळा टीका झेलूनही त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भूमिका घेतली आणि त्यासाठी स्वतःला टार्गेट होऊ दिलं. राजकीय आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात जिंकून मिळवलेले पूर्ण 27 टक्के आरक्षण हे सरकारचे आणि विशेषतः ओबीसी महासंघ व डॉ. फुके यांचे संयुक्त यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकारातून नागपूरमध्ये एक भव्य ओबीसी भवन उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 38 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, दीड ते दोन वर्षांत हे कार्य पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. हे भवन राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाच्या कामकाजाचं केंद्र ठरणार असून, डॉ. फुके यांच्या ध्येयशीलतेचे हे प्रत्यक्ष प्रतीक ठरेल. या संपूर्ण अधिवेशनात एक गोष्ट सतत चर्चेत राहिली, डॉ. फुके यांचा वाढता प्रभाव. राजकारणात अशी काही मोजकीच व्यक्तिमत्त्वं असतात जी समाजाच्या हृदयात घर करतात. डॉ. परिणय फुके हे त्याचे एक उदाहरण आहे.