महाराष्ट्रात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस खासदारांनी थेट दिल्लीतील मंत्रालयाबाहेर ठिय्या दिला.
उद्याचा भारत घडवणारा शेतकरी आज खतासाठी रांगेत उभा आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्वस्थ झाला आहे. शेतामध्ये बियाणं टाकलं गेलंय, पिकं डोलायला सुरुवात झाली आहे. पण खताशिवाय त्यांचं पोषण नाही आणि खताचं नाव घ्यायचं तर ते दुकानांमध्ये नाही, तर गोदामांमध्ये साठवलेलं आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार आक्रमकता दाखवली. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचे सह काँग्रेसच्या नेत्यांनी यांनी या गंभीर संकटावर बोट ठेवत थेट दिल्लीतील केंद्रीय रसायन व खते मंत्री जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी आवाज उचलत घोषणाचीबाजी केली. हा लढा केवळ घोषणांचा नव्हता, तर एका थेट आणि ठाम भूमिकेचा भाग होता, असे पण पडोळे म्हणाले.
पिकांचे नुकसान
जालना जिल्ह्यात बोगस खतांच्या प्रकरणांनी शेतकऱ्यांच्या चिंता अधिक वाढवल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या संगनमताने खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. याचा परिणाम असा की, शेतकऱ्यांना खत चढ्या दराने विकत घ्यावं लागत आहे. वेळेवर खत न मिळाल्यामुळे अनेकांचे पिकांचे नुकसान होत आहे. हा प्रश्न केवळ तांत्रिक नाही, तर शेतकऱ्यांच्या पोटावर मारणारा आहे.
खासदार प्रशांत पडोळे यांनी स्पष्ट सांगितले की, केंद्र सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही काहीही हालचाल दिसून आली नाही. मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे वेळ मागूनही त्यांनी भेट दिली नाही. या असंवेदनशीलतेला उत्तर म्हणून काँग्रेसच्या खासदारांनी थेट त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या.
Swachh Bharat Mission : नागपूरने स्वच्छतेच्या लढ्यात घेतली तेजस्वी उडी
गांभीर्याने घेण्याची अपेक्षा
शेवटी काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेपुढे मंत्री झुकले. खासदारांच्या शिष्टमंडळाला भेट देण्यात आली आणि त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले. मागण्या ऐकून घेण्याचे आश्वासन देत केंद्रानं उशिरा का होईना, का होईना, जाग येण्याचे लक्षण दाखवले. या आंदोलनाने एक गोष्ट ठळकपणे समोर आली की, शेतकऱ्यांचे प्रश्न जर ऐकले जात नसतील, तर ते थेट दिल्लीच्या दरवाजात जाऊन ठोठावले जातील. काँग्रेसच्या या पावलांनी हेच अधोरेखित केलं. सरकारने आता या तक्रारींना गांभीर्याने घेत ठोस पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतकरी आजही खत, पाणी, आणि बाजारभाव यांसारख्या मूलभूत गोष्टीसाठी संघर्ष करतो आहे. काँग्रेसच्या आंदोलनामुळे या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रात स्थान मिळालं आहे. आजचं हे आंदोलन केवळ राजकीय नव्हतं, ते एका लढवय्या घटकासाठी, शेतकऱ्यांसाठी होतं. खताचं राजकारण, बोगस पुरवठा, सरकारी यंत्रणेतील दुर्लक्ष आणि त्यात भरडला जाणारा शेतकरी याविरुद्धचा आवाज आज दिल्लीत बुलंद झाला.
पिकं आमचं आहे, श्रम आमचे आहेत, मग खतांसाठी आम्हीच का उपाशी? असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या प्रश्नाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बाजूने काँग्रेसने ठामपणे उभं राहत केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं.