कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आघात झाल्याचा आरोप करत आमदार रणधीर सावरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण हे महाराष्ट्राच्या मातृशक्तीचं प्रतीक असून, तिचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राच्या मतदारांनी लोकशाही प्रक्रियेतून स्पष्ट आणि ठोस जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आणि मतदारांचा वारंवार होणारा अपमान हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. सावरकर यांनी म्हटले की, जर निवडणुकीच्या प्रक्रियेवर इतकीच शंका असेल, तर महाविकास आघाडी नेत्यांनी सर्वप्रथम स्वतःचा विधानसभेचा राजीनामा द्यावा.
राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघातील निकालांवर शंका उपस्थित करत काही आक्षेपार्ह विधाने केली. याचा निषेध करत आमदार सावरकर म्हणाले, राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा आणि अस्मितेचा अवमान केला, तो अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. ‘लाडकी बहीण’ ही वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण राज्याच्या भावनांची प्रतीक आहे.
Yashomati Thakur : चोर की दाढ़ी में तिनका, आयोगावर भाजपचा मुखवटा
कुठे होते एजंट्स?
सावरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवरही निशाणा साधला. त्यांनी विचारले की, मतदार याद्यांबाबत आक्षेप घेण्यासाठी जेव्हा प्रारूप यादी जाहीर झाली होती, तेव्हा काँग्रेसचे 27 हजार बूथ एजंट्स नेमके कुठे होते? त्यावेळी केवळ 3 हजार 900 आक्षेप दाखल झाले आणि त्यातील फक्त 98 आक्षेप वैध ठरले. आता निकाल लागल्यानंतर प्रक्रिया बरोबर नव्हती असे सांगणे म्हणजे जनतेच्या मताचा अपमान नाही का?
शेवटच्या काही तासांत मतदानाचा टक्का वाढल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरही सावरकर यांनी प्रश्न उपस्थित केला. दिवसभराच्या दर तासाच्या आकडेवारीबाबत विरोधकांनी पारदर्शकता दाखवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळाला तर त्यात चूक काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.
आयोगालाच देतात दोष
याच मुद्द्यावर भाजप नेते आशीष शेलार यांनीही काँग्रेसवर टीका केली. त्यांनी म्हटले, मतदान वाढले तर यांना त्रास, मतदार याद्यांची सफाई केली तरी आरोप, आणि हार झाली की निवडणूक आयोगावर दोष. झारखंड, तेलंगणा आणि कर्नाटकात काँग्रेसला फायदा झाला तेव्हा प्रक्रिया बरोबर वाटली, मग महाराष्ट्रात पराभव झाला तरच शंका का?
आमदार सावरकर यांनी सांगितले की विरोधकांना जनादेश पचवता येत नाही. मतपेटीतून जनतेने तुमच्यावर अविश्वास दाखवला आहे. तो पचवता न आल्यामुळे आता निवडणुकीवरच शंका घेणे, हे केवळ पराभवाची तडजोड आहे. अशा मानसिकतेमुळे महाराष्ट्राच्या लोकशाहीची थट्टा होते, असे ते म्हणाले.
आमदार सावरकरांनी ठामपणे सांगितले, हा केवळ निकालाचा मुद्दा नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकांनी ठरवलेले नेतृत्व आणि त्यांची मते हे सर्वोच्च आहेत. त्याचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. आता भाजप हातावर हात धरून बसणार नाही, महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी उभी राहील.