नागपूरमध्ये 145 वर्षांच्या परंपरेचा बडग्या-मारबत उत्सव शांततेत पार पडला. ज्यात लाखो नागरिकांनी सहभाग घेतला आणि शहराची सांस्कृतिक ओळख जपली.
नागपूरचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती ही नेहमीच वेगळी ओळख निर्माण करणारी राहिली आहे. याच परंपरेतला एक अनमोल ठेवा म्हणजे 145 वर्षांची परंपरा लाभलेला ‘बडग्या-मारबत उत्सव’. जगातला एकमेव असा उत्सव जो केवळ नागपूरात साजरा होतो आणि नागरिकांनी आजवर अविरतपणे जपला आहे. शनिवारी (23 ऑगस्ट रोजी) हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला. लाखो लोकांच्या उपस्थितीत शहराने पुन्हा एकदा स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा प्रत्यय दिला. परंतु याच उत्सवात राजकीय रंगही उधळताना दिसले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण आधीपासूनच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी मारबत उत्सवाच्या माध्यमातून चांगलेच शक्ती प्रदर्शन केले. 145 वर्षांची परंपरा असलेला मारबत आणि बडग्या उत्सव यंदा केवळ धार्मिक वा सामाजिक सोहळाच नव्हता, तर तो राजकीय शक्तीप्रदर्शनाचा मंच ठरला.
शहराच्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, भाजप आणि काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांनी उत्सवात मोठ्या प्रमाणात आपली ताकद दाखवली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही पिवळी मारबत जागनाथ येथून आणि काळी मारबत नेहरू पुतळा चौकातून निघाली. दोन्ही मिरवणुका चौकात एकत्र आल्या आणि पुढे प्रचंड जल्लोषात मार्गक्रमण करत राहिल्या. नागपूरचा हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीत केवळ भक्तीभाव नव्हता, तर राजकीय झेंडे, स्टॉल्स आणि कार्यकर्त्यांचा उत्साहही तितकाच दृष्टीस पडत होता. भाजपच्या वतीने आमदार प्रवीण दटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्टॉल लावून मारबत आणि बडग्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. महाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असल्याने भाजपने आपली ताकद दाखवण्याची संधी सोडली नाही.
Maharashtra : कर्जमाफी विसरले सरकार, पण कबुतरांना दिला ‘राजा का मान’?
उत्सवाचा आगळावेगळा रंग
भाजपच्या युवा मोर्चानेही मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली. दुसरीकडे, काँग्रेसनेही मागे न हटता आपले बळ दाखवले. काँग्रेसचे बंटी शेळके आणि त्यांचे कार्यकर्तेही मागे राहिले नाहीत. त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत मारबतचा जल्लोष उंचावला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण जाणवत होते. नागरिकांचे स्वागत, जल्लोष आणि घोषणांनी काँग्रेसने आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाल भागातून काँग्रेसनेच भाजपला आव्हान दिले होते, त्यामुळे या मिरवणुकीतील त्यांची उपस्थिती राजकीय संदेश देणारी ठरली. काही महिन्यांपूर्वीच धार्मिक वादावरून नागपूरने कधीही न अनुभवलेली दंगल अनुभवली होती. त्या घटनेमुळे आठवडाभर शहरात अस्वस्थता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, दंगली नंतरचा हा पहिला मोठा उत्सव असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.
महाल भागातच दंगल घडली होती. त्यामुळे पोलिसांनी यंदा अधिक दक्षता घेतली होती. हजारो पोलीस तैनात करून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली गेली. शेवटी, मिरवणूक यशस्वीरीत्या पार पडल्यावर पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला. ‘बडग्या-मारबत’ हा जगातील एकमेव उत्सव आहे, जो केवळ नागपूरमध्ये साजरा होतो. पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक परंपरेशी जोडलेला हा सोहळा शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. 145 वर्षांची अखंड परंपरा जपत नागरिकांनी उत्सवाचा आनंद लुटला. मात्र यंदा धार्मिक सोहळ्या इतकाच राजकीय शक्तीप्रदर्शनाचाही गजर ऐकू आला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख पक्षांनी केलेले प्रदर्शन पाहून, मारबत उत्सवातल्या गर्दीचा उपयोग मतदारांच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी होतोय का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप
