राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभरात मोठा वादंग माजला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवरुन केलेल्या तिखट संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उत्खननाच्या तक्रारीवरुन कारवाईसाठी पोहोचलेल्या पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी अजित पवार यांनी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधला. पण हा संवाद इतका तापला की, त्याची धग राज्यभर पसरली. या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी उचलली. पण आता, मिटकरींनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त करत आपली भूमिका मागे घेतली आहे. कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्याने करमाळ्याच्या पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. तिथे गावकऱ्यांशी त्यांची शाब्दिक चकमक सुरु असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो अंजना यांच्या हातात सोपवला.
पक्षाशी निष्ठा जाहीर
अंजना यांना मात्र अजित पवारांचा आवाज आणि त्यांचे नावही ओळखता आले नाही. मी डीसीएम अजित पवार बोलतोय, ही कारवाई थांबवा, असं पवारांनी दोनदा सांगितले, पण अंजनांनी माझ्या फोनवर कॉल करा, असं उत्तर दिलं. यावर संतापलेले पवार म्हणाले, इतकी हिम्मत आहे तुमची? माझा चेहरा तरी ओळखाल ना? मग त्यांनी थेट व्हिडीओ कॉल करुन अंजनांना बांधावर बसवत आदेश दिले, तहसीलदारांना सांगा, माझा फोन आलाय हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या प्रकरणाने राजकीय वातावरण तापत असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आगीत तेल ओतलं.
मिटकरींनी थेट यूपीएससीला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. त्यांचा दावा होता की, पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना यांच्या निवडीतही काहीतरी गडबड आहे. त्यांनी अंजना यांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची छाननी करावी, असं पत्रात म्हटलं होतं. पण, अवघ्या काही तासांत मिटकरींनी सोशल मीडियावर यूटर्न घेतला. सोलापूर प्रकरणातील माझा ट्वीट मी बिनशर्त मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. ही माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हे. मी पक्षाच्या नेतृत्वाच्या भूमिकेशी सहमत आहे, असं त्यांनी जाहीर केलं.
Pratibha Dhanorkar : भद्रावती-वरोरात काँग्रेसची ध्वस्त अवस्था
पोलिस दल आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांबद्दल आपल्याला आदर असल्याचंही त्यांनी सांगितलं.या सगळ्या नाट्यमय घडामोडींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणामुळे अजित पवार यांची छबी एक नवीन वळण घेत आहे.
