महाराष्ट्र

Akola Police : भारती, लोहार, निकम आणि आता अर्चित चांडक

IPS Archit Police : अकोलेकरांचे रक्षक बनले पोलीस अधीक्षक

Post View : 117

Author

एखाद्या नेत्याचा किंवा आमदाराचा उदो उदो प्रत्येक जण करतात. एखाद्या महाराजाचा उदो उदो सगळीकडे केला जातो. त्यांची मिरवणूक निघते. पण अकोला हे शहर असे आहे की, ज्यांनी ज्यांनी अकोल्यासाठी काही केले त्यांना अकोलेकर डोक्यावर घेऊन नाचले आहे.

अकोला हे पूर्वीपासून दंगलींचं गाव म्हणून ओळखलं जात. एकूणच जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम अश्या दंगली होत असतात. आतापर्यंत अनेक बळी या दंगलीच्या राक्षसांनी घेतले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे कर्तबगार अधिकारी अकोल्यामध्ये आले त्यांच्यासाठी अकोलेकर रस्त्यावर उतरले. त्यामध्ये काही नावे प्रामुख्याने घेता येतात. यामध्ये अकोल्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि मुंबईचे आताचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे अग्रस्थानी आहेत. त्यानंतर नितीन लोहार (पवार), रश्मी अवस्थी-शुक्ला ज्या आताच्या पोलीस महासंचालक आहेत. त्यानंतर आयएएस अधिकारी एकनाथ डवले आणि तत्कालीन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीने आता विद्यमान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे सध्या अकोल्यातील तरुणाईसाठी ‘युथ आयकॉन’ बनले आहेत.

अकोल्यातील दंगलीचा पॅटर्न मोडून काढण्याचे काम देवेन भारती आणि नितीन लोहार यांनी केले. देवेन भारती एसपी असताना अकोला शहराचे पोलीस उपअधीक्षक नितीन लोहार होते. देवेन भारती आणि नितीन लोहार यांच्या काळामध्ये फार मोठी दंगल घडली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील स्टुडन्ट इस्लामिक मुव्हमेंटचे (SIMI) नेटवर्क देवेन भारती आणि नितीन लोहार यांनी उद्ध््वस्त केले होते. या कामगिरीमुळे यामुळे देवेन भारती यांना सलग अनेक वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त म्हणून या पदावर ठेवले होते.कर्तबगार अधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस नेहमीच कदर करतात. त्यामुळे भारती यांना राज्याचं एटीएस प्रमुखही करण्यात आलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भारती तेवढे बाजूला होते. फडणवीस मुख्यमंत्री होताच पुन्हा मुंबईची धुरा त्यांनी भारती यांच्या हाती सोपविली.

मुंबईत ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी देवेन भारती आणि एक पोलिस एके-47 घेऊन थेट हॉटेलमध्ये घुसले होते. देशभरातील टीव्ही चॅनलने हे दृष्य त्या वेळी ठळकपणे दाखविले. अर्थात भारती यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडत नाही. ते नेहमीच प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. त्यामुळं त्यांनी या कामगिरीचा देखावा आणि भांडवल दोन्ही केलं नाही. देवेन भारती आणि नितीन लोहार यांना अकोल्यातील कार्यकाळात लोक अक्षरशः हिरो मानायचे. सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी अवस्थी शुक्ला यांचं आयपीएस म्हणून करीअर खऱ्या अर्थानं अकोल्यात सुरू झालं. त्या देखील अकोला शहराच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक होत्या. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची त्यावेळी ओळख होती. रश्मी अवस्थी-शुक्ला यांनी दरवेळी होळीला होणाऱ्या अकोल्यातील दंगलीचा पॅटर्न मोडीत काढला होता.

Mahajyoti : क्यूआर कोडच्या एका क्लिकवर ज्ञानाचा खजिना

शेतकऱ्यांचे मसिहा

अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. त्यांची बदली झाली त्या वेळी शेतकऱ्यांनी अकोल्यामध्ये आंदोलन केले. डवले हे अकोल्याच्या शेजारी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील डवला या मागावातील मूळ रहिवासी आहेत. अकोल्यात कलेक्टर असताना ते सुटीच्या दिवशी डवला या आपल्या मूळ गावात मुक्कामी असायचे. तेथील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करायचे. अकोल्यातील आपल्या कार्यकाळात एकनाथ डवले सगळ्यात फास्ट निर्णय घेणारे कलेक्टर ठरले. कुणी त्यांच्याकडे फिर्याद घेऊन गेला की, 15 मिनिटांत विषयाचा तुकडा पाडून ते मोकळे व्हायचे

अकोल्यातील यादव नावकर खून राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती. यादव नावकर खून खटल्याचा निकाल लागला तेव्हा, आरोनी अजय घालटला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टानं शिक्षा सुनावताच अकोलेकरांनी प्रचंड जल्लोष केला होता. उज्ज्वल निकम यांना थेट डोक्यावर घेऊन कोर्टापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत मिरवणूक काढली होती. त्यानंतर मात्र अकोल्यामध्ये फार कमी असे अधिकारी आले जे लोकांसाठी हिरो ठरले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मध्यंतरीचा काळ उदासीन होता. अनेक अधिकारी आले, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये व्यवस्था बिघडत गेली. मात्र अचानक ‘समय ने करवट बदली’, अर्चित चांडक हे नागपूरहून अकोल्याला गेले. नितीन गडकरी आणि देवाभाऊंच्या गावातील वाहतुकीला ज्यांनी शिस्त लावली ते आता अकोल्याच्या कायद्या व सुव्यवस्थेलाही शिस्त लावत आहेत. सर्वांत आधी त्यांनी कुख्यात गुंडांना गजाआड केले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. अवैध दारू विक्री बंद केली. कावड महोत्सवामध्येही त्यांनी गुंडांना चांगलाच दम भरला. ‘तुम गडबड करोगे. तुम हमारा एक दिन खराब करोगे. लेकिन मैं ऐसी कलम लगाऊंगा की, तुम्हारे पंधरा साल खराब करूँगा’ असा दम त्यांनी दिला.

हमारा एसपी कैसा हो..

चांडक यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की, गणपतीची मिरवणूक ज्या वेळेला निघाली, त्यावेळेला अकोलेकरांनी थेट अर्चित चांडक यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. अकोल्यातील मोहद अली रोड हा अत्यंत संवेदशनशील भाग. गणेश विसर्जन मिरवणूक या भागातून जाताना पोलिसांसाठी डोक्यावर टेन्शन असते. नेहमी प्रमाणे यंदाही कच्छी मशिदीजवळ पोलिसांचा प्रचंड वेढा होता. सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अमरावती परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, एसपी अर्चित चांडक पूर्णवेळ ताजनापेठ पोलिस चौकीवर तळ ठोकून होते. एक एक करीत मंडळ कच्छी मशिदीजवळ येत होते. पण घोषणा वेगळ्याच होत्या. ‘अकोला का एसपी कैसा हो, अर्चित चांडक जैसा हो’. ’अकोला का एसपी कैसा हो, अर्चित चांडक जैसा हो.’ अशा घोषणा तरूण देत होते. एक दोन नव्हे तर प्रत्येक मंडळातील कार्यकर्ते या घोषणा देत होते. आयजी पोकळे आणि चांडक यांनाही यामुळं आश्चर्याचा धक्का बसला. अकोल्यानं या अशा घोषणा अनेक वर्षांनंतर ऐकल्या. अनेक वर्षांनंतर असा अधिकारी अकोल्याला आलाय, ज्याच्या नावानं लोक जयजयकार करीत आहेत, याचं समाधान अकोल्याला वाटत होतं. अर्चित चांडक हे तरुणच आहेत. त्यामुळे तरूण रक्ताचा हा अधिकारी नक्कीच अकोल्याचं भलं करेल यात शंकाच नसल्याचं यावरून दिसतं.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!