भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी अत्यंत वादग्रस्त शब्द वापरल्याने भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू असतात. पण सध्या सत्ताधारी महायुती सरकारमधील काही मंत्री आणि नेत्यांना बेताल वक्तव्य करण्याची सवय लागली आहे, असेच दिसते. विरोधकांना आणि जनतेला उपहासाचा विषय बनवण्याच्या या प्रकाराने राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. अशातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याविरुद्ध अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केले. ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वक्तव्याने विरोधकांकडून भाजप सरकारवर तीव्र टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या बेताल वक्तव्यांची तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांनी स्वतः पडळकरांना तंबी देत असे वक्तव्य टाळण्याचे आदेश दिले. पण तरीही हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावरून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला आहे. यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, भाजप 2014 वर्षी सत्तेत आल्यापासून वाचाळवीर नेत्यांचे प्रभूत्व महाराष्ट्रात वाढले आहे. भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई-बहिणींवर बोलत आहेत, ते पाहता त्यांच्या तोंडातून गटार वाहत आहे असेच वाटते, असे त्या म्हणाल्या.
शिस्तीचा इशारा
वक्तव्य किती खालच्या पातळीचे आहे याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, जयंत पाटील हे केवळ माजी मंत्री आणि आमदार नव्हे, तर स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे वारस आहेत. बापूंचे शेतकरी, दलित आणि महाराष्ट्रासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. अशा व्यक्तीच्या कुटुंबावर असा हल्ला करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. या सर्व प्रकरणाने महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झाली आहे. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, कुठल्या पातळीवर बोलले जात आहे? काय सुरू आहे महाराष्ट्रात? देवेंद्र फडणवीस, तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचे जतन करत आहात ते तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. ‘जरा खुद के गिरेबान में झांक के देखिए… हो क्या रहा है.’ या शब्दांत त्यांनी फडणवीसांना सुनावले. त्या म्हणाल्या की, या सर्व गोष्टी अतिशय वेदनादायी आहेत. आम्ही हे सहन करणार नाही.
जयंत पाटील यांच्या परिवाराबद्दल जे काही बोलण्यात आले, त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंवर कोणी तरी टीका केली तर तुम्ही म्हणता ‘ये देश के माताओं का अपमान आहे’, असे उदाहरण देत ठाकूर यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. राजारामबापूंच्या पत्नी, जयंत पाटील साहेबांच्या आई म्हणजे आमच्या देखील आई आहेत. आई-बहिणींचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे त्या ठामपणे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे आणि शिस्तीत ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. हे प्रकरण फक्त दोन नेत्यांपुरते मर्यादित नसून, ते महाराष्ट्राच्या राजकीय नैतिकतेच्या मुद्द्याशी जोडलेले आहे. सत्ताधाऱ्यांकडून असे वक्तव्य होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असा इशारा विरोधक देत आहेत.