महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीतून प्रगतीचे नवे रोपटे फुलत आहे. या हरित क्रांतीचे नेतृत्व करत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि सामंजस्य करारांना मूर्त रूप दिले. विशेषतः विदर्भ, जो नेहमीच विकासाच्या बाबतीत मागे राहिला, त्याला आता फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे नवसंजीवनी मिळत आहे. या भागाला त्यांनी आपल्या राजकीय बालेकिल्ल्यापेक्षा अधिक काहीतरी बनवले आहे. एका नव्या आर्थिक समृद्धीचे केंद्र.
मुंबईतील गोरेगाव येथे नुकत्याच आयोजित ‘आयफा स्टील महाकुंभ’ या भव्य कार्यक्रमात फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपली विकासाची जादू दाखवली. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने स्टील आणि सहाय्यक उद्योगांशी संबंधित 9 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमुळे तब्बल 80 हजार 962 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. विशेष म्हणजे यातून 90 हजार 300 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार असून, प्रत्येक भागाला विकासाच्या नव्या लाटेचा लाभ मिळणार आहे. विदर्भ हा फडणवीस यांचा गड मानला जातो. पण आता तो केवळ राजकीय गड न राहता आर्थिक विकासाचा किल्ला बनत आहे.
Corporation Election : पक्षांतराच्या मायाजाळात ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?
विदर्भाला सुवर्ण संधी
करारांमुळे विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि. गडचिरोलीत 25 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे 20 हजार रोजगार संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे, सुमेध टूल्स प्रा. लि. 2 हजार कोटींची गुंतवणूक आणि 1 हजार 500 रोजगार संधी घेऊन येत आहे. हरिओम पाईप्स गडचिरोलीत 3 हजार 135 कोटी आणि 2 हजार 500 रोजगार संधींसह योगदान देणार आहे. चंद्रपूरमध्ये आयकॉन स्टील इंडिया प्रा. लि. 850 कोटी आणि 1 हजार 500 रोजगार संधी निर्माण करेल. तर जी. आर. कृष्णा फेरो अलॉयज प्रा. लि. 1 हजार 482 कोटी आणि 500 रोजगार संधी देणार आहे. महाराष्ट्र केवळ पारंपरिक स्टील उद्योगातच नव्हे, तर ग्रीन स्टीलच्या क्षेत्रातही देशात अग्रेसर होण्याच्या मार्गावर आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन ग्रीन स्टील’ला पाठिंबा देताना सांगितले की, महाराष्ट्र या क्षेत्रात सर्वांत मोठी भूमिका बजावेल. रायगड मधील जिंदाल स्टेनलेसच्या 41 हजार 580 कोटींच्या गुंतवणुकीमुळे 60 हजार रोजगार संधी निर्माण होणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) 5 हजार 440 कोटी आणि 2 हजार 500 रोजगार संधी घेऊन येत आहे. साताऱ्यात फिल्ट्रम ऑटोकॉम्प प्रा. लि. 100 कोटी आणि 1 हजार 200 रोजगार संधी निर्माण करेल. तर नागपूरमध्ये जयदीप स्टील वर्क्स इंडिया प्रा.लि. 1 हजार 375 कोटी आणि 600 रोजगार संधी देणार आहे.या सर्व करारांमुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात समृद्धीचा प्रकाश पडणार आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचत आहे.
ग्रीन स्टीलपासून रोजगार निर्मितीपर्यंत, हे पाऊल महाराष्ट्राला देशातील आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. भविष्यातील महाराष्ट्र केवळ स्वप्न नसून, प्रत्यक्षात उतरत असलेली एक वास्तविकता आहे.