अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना, संकटमोचक म्हणून मिरवणारे मंत्र्यांचे अस्तित्व क्वचित दिसत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना न समजणाऱ्या आणि सत्तेसाठी पळ काढणाऱ्या मंत्र्यांवर गंभीर टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या बळीराजाला नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि वेळोवेळी आश्वासनांचा खोटा आधार, या सगळ्यांतून तो एकटा लढत असतो. पण जेव्हा संकटाची छाया गडद होते. तेव्हा स्वतःला ‘संकटमोचक’ म्हणवणारे नेतेमंडळी कुठे गायब होतात? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी मंत्र्यांच्या असंवेदनशील वर्तनावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ प्रसिद्धी मिळवण्यात धन्यता मानणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. बळीराजाच्या वेदनेची थट्टा करणाऱ्या या नेत्यांच्या कृतीमुळे शेतकरी समाजात असंतोष पसरला आहे.
सत्तेच्या गलिच्छ खेळात मग्न असलेले हे मंत्री. ज्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलले. नेते पळवले आणि स्वतःच्या प्रभावाची जाहिरात केली. ते आज बळीराजाच्या संकटकाळात का पाठ फिरवतात? विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नाला धारदार शब्दांत बोट ठेवले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. कर्जाचा बोजा वाढला आणि जीवन जगण्याची आशा धूसर झाली. अशा वेळी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा समजून घेणे अपेक्षित आहे. पण, रस्त्यावर गाडी अडकते म्हणून माघारी फिरणारे हे नेते. रोज त्या खड्डेमय रस्त्यांवरून पायपीट करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख कसे काय समजू शकतील?
Devendra Fadnavis : शेतकरी पुन्हा उभा राहावा, हाच सरकारचा संकल्प
बळीराजाच्या वेदनेची उपेक्षा
विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या या असंवेदनशील वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची वेळ येते तेव्हा केवळ छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा लागते. पण त्या शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबाची हलाखी याकडे कोणाचे लक्ष नाही. वडेट्टीवार म्हणतात, ज्या मंत्र्यांना खराब रस्त्यांमुळे शेतापर्यंत पोहोचणे जड जाते. त्यांनी त्या रस्त्यावरून रोज चालणाऱ्या शेतकऱ्यांचे संकट तरी समजून घ्यायला हवे. त्यांच्या या शब्दांतून शेतकऱ्यांप्रती असलेली खरी संवेदना आणि सत्ताधाऱ्यांच्या ढोंगीपणावर प्रहार दिसतो.
सत्तेच्या खुर्चीवर बसलेले हे नेते स्वतःला शेतकऱ्यांचे रक्षक म्हणवतात. पण प्रत्यक्षात त्यांचे कृत्य बळीराजाला एकटे सोडणारे आहे. वडेट्टीवार यांनी या नेत्यांच्या दुटप्पी वागणुकीवर प्रकाश टाकताना सांगितले की, ज्यांना बळीराजाच्या वेदना समजत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचा क्षमादान मिळणार नाही. त्यांचा हा इशारा सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाची जाणीव करून देणारा आहे. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई आणि कर्जमाफी याबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जाण्याची गरज आहे. पण मंत्र्यांचे पळ काढणे आणि त्यांचा शेतकऱ्यांप्रती उदासीन दृष्टिकोन यामुळे शेतकरी समाजात असंतोष वाढत आहे.
Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी कृती दलाची स्थापना
विजय वडेट्टीवार यांनी या टीकेतून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटकाळात सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त पिकांचे योग्य मूल्यांकन करावे आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बळीराजाच्या या लढ्यात विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते त्यांचा आवाज बुलंद करत आहेत. पण प्रश्न असा आहे की, सत्ताधारी या आवाजाला कधी प्रतिसाद देणार? शेतकऱ्यांच्या संकटात खऱ्या अर्थाने कोण ‘संकटमोचक’ ठरणार?