
राज्यामध्ये ‘देवेंद्रपर्व’ सुरू झाल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहेत. सरकारच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाले आहेत.
राज्याचा राजा अर्थात मुख्यमंत्री बदलल्यानंतर सहाजिकच प्रशासकीय फेरबदल अपेक्षित असतात. प्रत्येक सीएम अन् सरकार आपापल्या सोयीनुसार अधिकाऱ्यांची नेमणूक करते. राज्यात देवेंद्रपर्व पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणं आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवार, 24 डिसेंबरला निघाले आहेत. यातील अनेक अधिकारी असे आहेत, ज्यांचा कधी ना कधी देवेंद्र फडणवीस किंवा नागपूरशी संबंध होता.
राज्यातील प्रशासनात झालेल्या बदलांमुळे विकास प्रक्रियेत नवं वळण येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये बदल केले आहेत. विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीनं होणार आहे.

अनेक Department मध्ये नवे साहेब
नागपूरचे माजी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांचीही बदली करण्यात आली आहे. अनबल्गन पी., संजय दैने, राहुल कर्डिलें, वान्माथी सी., संजय पवार, अण्णासाहेब चव्हाण, गोपीचंद कदम यांचं नावही बदलीच्या यादीत आहे. त्यामुळं अनेक विभागांना नवे साहेब मिळाले आहेत. अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमुळे राज्यातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये नवा जोम आणि कार्यक्षमता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन बी. हे आता महाजेनकोचे अध्यक्ष असतील. राधाकृष्णन हे नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. ऊर्जा विभाग स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच आहे. त्यामुळं राधाकृष्णन यांच्याकडं हे पद देण्यामागं मोठं पाऊल मानलं जात आहे. राधाकृष्णन यांच्यावर फडणवीसांनी या नियुक्तीतून मोठा विश्वास दाखविल्याचं सांगण्यात येत आहे. महाजनकोचे विद्यमान अध्यक्ष अनबल्गन हे आता उद्योग विभागाचे सचिव असतील.
East Vidarbha मध्ये नवे अधिकारी
पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतही प्रशासकीय बदल झाले आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने हे नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त असतील. यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यामुळं दैने यांचं देखील फडणवीस कनेक्शन आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना नाशिक महापालिका आयुक्तपदी पाठविण्यात आलं आहे. नागपूर विभागातून त्यांना ‘बेस्ट कलेक्टर’ पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक महापालिकेचं राज्यात महत्त्वपूर्ण स्थान आहे. अलीकडेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. नाशिक भागात त्यांचं वर्चस्व आहे. त्यामुळं कर्डिले यांच्या नियुक्तीतून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे, याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. राज्य कर सहआयुक्त वान्माथी सी. हे आता वर्धाचे जिल्हाधिकारी असतील. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यातही बदल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांना मुंबईत पाठवण्यात आलं आहे. या पदावर पुन्हा विवेक जॉन्सन हे रूजू होतील.
बदलाचे वारे Pune जिल्ह्यातही
पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण हे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सोलापूर जिल्ह्यांतील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी गोपीचंद कदम यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्प एक महत्वाकांक्षी शहरी विकास योजना आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर राज्यातील आयपीएस अधिकारी देखील बदलले जाऊ शकतात. याशिवाय अन्य शासकीय विभागांमध्येही बदल शक्य आहे.