
Views: 19871
अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही विजय मिळवल्यानंतर उमेदवारांचे भाव चढतात. अशात तर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला म्हटल्यानंतर खासदाराचे भाव तर सोन्यापेक्षा जास्त चढायला पाहिजे. परंतु अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये अनुप धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. संजय धोत्रे यांचा वारसा अनुप धोत्रे हे चालवत आहेत. राजकीय क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन नाही. परंतु निवडणुकीमध्ये मिळालेला विजय त्यांनी अंगात आणू दिलेला नाही. सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात गेलेली नाही. अत्यंत साधेपणाने अनुप धोत्रे हे आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. दिवसभराचा क्षीण घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अनुप धोत्रे हे घराबाहेर पडतात.

सकाळी अनेक जण धोत्रे यांच्या भेटीसाठी त्यांच्या अकोल्यातील निवासस्थानी पोहोचलेले असतात. या सगळ्यांना धोत्रे यांच्या स्टाफकडून अत्यंत सौजन्य पूर्ण वागणूक दिली जाते. साधारण नऊच्या सुमारास खासदार अनुप धोत्रे हे सगळ्यांची भेट घेतात. त्यानंतर तातडीने ते आपल्या मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांच्या भेटीसाठी निघून जातात. निवडणूक आटोपल्यानंतर पाच वर्ष खासदार मतदारसंघातून गायब राहतात, असा अनुभव लोखंदा येतो. मात्र अनुप धोत्रे यांच्याबाबत तसे नसल्याचे लोक सांगत आहेत.
BJP साठी काम
खासदार अनुप धोत्रे यांच्या साधेपणाचा अनुभव अलीकडेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आला. विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपने अकोल्यामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी भाजपने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले. या अभियानासाठी भाजपच्या कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी खासदार अनुप धोत्रे हे देखील उपस्थित होते. बैठकीच्या दिवशी अनुप धोत्रे हे सकाळीच लवकर घराबाहेर पडले होते. घरी केवळ चहा घेतल्यानंतर धोत्रे यांनी मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या.
निवडणुकीच्या वरातीनंतर Radhakrishna Vikhe Patil येणार अकोल्यात
भेटीगाठीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर खासदार अनुप धोत्रे हे अकोला शहरातील भाजपच्या कार्यालयात दाखल झालेत. त्यांनी सदस्यता नोंदणी अभियानाच्या बैठकीला उपस्थिती लावली. बैठक संपेपर्यंत घड्याळीच्या काटा साडेचारच्या सुमारास पोहोचला होता. जिथे लोक दुपारचे जेवण करून वामकुक्षी घेत होते, तिथे खासदार अनुप धोत्रे यांनी जेवण केलं. घरातून घेतलेला आपला डबा त्यांनी भाजपच्या कार्यालयात उघडला. भाजप कार्यालयातील कक्षात बसून त्यांनी या डब्यातून भोजन केले. भोजन करत असतानाही ते कक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संवाद साधत होते. प्रत्येकाला आपुलकीने ‘या जेवायला’, असं म्हणत होते.
खासदार अनुप धोत्रे यांच्या या साधेपणाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये आहे. धोत्रे हे मुळात शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील संजय धोत्रे हे देखील खासदार होते. गल्लीतून दिल्लीत गेले तरी धोत्रे कुटुंबाचे शेतीवर असलेले प्रेम कायम आहे. सर्वसाधारणपणे कोणताही शेतकरी सकाळी लवकर घराबाहेर पडतो. सोबत आपली शिदोरी नेतो. शेतातील मशागत आटोपल्यानंतर एखाद्या झाडाच्या सावलीखाली बसून भोजन ग्रहण करतो. अनुप धोत्रे यांचा हा क्रम देखील सुरू आहे. फरक इतकाच आहे की शेती राजकीय आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी ते परिश्रमाची मशागत करीत आहेत. त्यातच वेळ मिळाला तर भारतीय जनता पार्टी नावाच्या वटवृक्षाच्या सावली खाली ते भोजन ग्रहण करताना दिसत आहे.
खासदार म्हणून First Term
अनुप धोत्रे यांची खासदार म्हणून पहिली टर्म आहे. आपल्या वडिलांना त्यांनी खासदार म्हणून काम करताना पाहिले आहे. त्यामुळे खासदाराला काय करावं लागतं हे नव्याने सांगण्याची त्यांना गरज नाही. परंतु त्यानंतरही आपल्याला सगळं काही समजते, असा अहंकार अनुप धोत्रे यांच्यामध्ये दिसत नाही. आपल्या पद्धतीनुसार अनुप धोत्रे हे सध्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळे विकास प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून अकोला लोकसभा मतदारसंघात विकासाचा नवा इतिहास घडावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.