
Views: 11231
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही बदल केले. नागपुरातील भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना पक्ष संघटनेत स्थान देण्यात आलं आहे.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रदेश प्रभारी नेमल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये काही फेरबदल केले आहेत. पक्षाच्या अनुशासन समिती अध्यक्षपदी नागपुरातील माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नीकटवर्तीय आहेत. नागपुरात होणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोले हे आमदार होते.

गेल्या निवडणुकीत प्रा. सोले यांच्याऐवजी भाजपनं नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना उमदेवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत जोशी यांचा पराभव झाला. त्यामुळं नागपूर पदवीधर मतदारसंघ स्थापन झाल्यानंतर प्रथमच या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचे अभिजित वंजारी हे या मतदारसंघाचे ‘हिस्ट्रिमेकर’ आमदार झालेत. त्यानंतर आता भाजपनं प्रा. सोले यांना प्रदेश पातळीवर संधी दिली आहे. पक्षांतर्गत शिस्त व अनुशाासन समितीचे ते प्रमुख राहणार आहेत.
पुन्हा Orange City पावरफूल
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नागपूरचं प्राबल्य वाढलं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सरकारचं नेतृत्व करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातीलच चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाले आहेत. आशिष जयस्वाल यांनाही राज्यमंत्री करण्यात आलं आहे. त्यानंतर आता प्रा. सोले यांनाही प्रदेश पातळीवर एका महत्वाच्या समितीचं प्रमुख करण्यात आलं आहे. त्यांच्या सोबतीचा सदस्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातून किशोर शितोळे हे या समितीत असतील.
माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुण्यातून योगेश गोगावले यांना सदस्य करण्यात आलं आहे. प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानही सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाच्या प्रमुख पदावर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे पुण्यातील आहेत. बीड येथील प्रवीण घुगे यांना अभियान सहप्रमुख करण्यात आलं आहे. संघटनात्मक बदलांनंतर भाजप आता व्यापकपणे पुढील निवडणुकीची तयारी करणार आहे. लवकरच राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर पंचायत निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी भाजपनं व्यापक व्यूहरचना आखणं सुरू केलं आहे. राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये भाजपला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळं व्यापक प्रमाणावर संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत.