
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या मुद्द्यावरून त्यांनी महायुती सरकारवर निषणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भरभरून यश प्राप्त केले. महाराष्ट्रात भाजपला जोरदार फटका बसला होता. भारतीय जनता पार्टी आमच्या सर्वांचा राजकीय शत्रू आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एक होतो. त्यामुळे राज्यात आम्ही चांगल्या जागा मिळवू शकलो. दुर्दैवाने दिल्लीत असे चित्र दिसत नाही. दिल्लीची सत्ता अमित शाह, नायब राज्यपाल आणि नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. विधानसभेत भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे होतं. आपसातील वादविवाद मिटवून एकत्र लढलो नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असे महाविकास आघाडीतील शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
राजकारणी, पोलिस आणि आरोपी यांचे फोटो समोर येत आहेत. त्यावरून लक्षात येते की, बीडमध्ये लोकांना फसविण्याचा खेळ सुरू आहे. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अतिशय मंदपणे सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत संजय राऊत म्हणाले की, बीडचं पोलिस खातं बरखास्त करण्यात यावं. संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेरून चालवावं. एसआयटीमधील कोणता अधिकारी आरोपीशी संबंधित आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली पाहिजे.

Murder तपास धूळफेक
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास देखील धूळफेक आहे. आत्तापर्यंत आरोपींना वाचवण्याचेच प्रकार सुरू आहेत. सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात. बीड पॅटर्न नावाचा कलंक महाराष्ट्राला लागत आहे. तो पुसण्यासाठी सुरेश धस यांनी सामान्य माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे राऊत म्हणाले.
भारतीय संविधानातील ‘इंडियन एव्हिडन्स अॅक्ट’ अजित पवारांनी बदलला की काय? हे आधी त्यांनी सांगावं. ईव्हीएमची कृपा होती. त्यामुळे अजित पवारांना इतक्या जागा मिळाल्या आहेत. अजित पवार हे ‘अॅक्सिडेंटल’ नेते आहेत. अजित पवार जर नेते असते तर त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळलायला हवं होतं, असं राऊत यांनी म्हटलं. कुठलेही पुरावे नसताना आम्हाला तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे नाही वगैरे काहीही अजित पवार बोलले नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, लोकसभेला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते. याचं मला आश्चर्य वाटत आहे. अरविंद केजरीवाल आमच्या व्यासपीठावर आले होते. काँग्रेस पक्षाने दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराला शिवसेना समर्थन देत नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहिलं पाहिजे. टीका वगैरे होऊ शकते,l राजकीय विरोध होऊ शकतात. परंतु अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणे योग्य नाही, असेही राऊत यांनी म्हटलं.