
महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरू झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेलं हे सत्र अद्यापही कायम आहे.
राज्यात महायुती सरकार सत्तारूढ झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय फेरबदल सुरू केले आहेत. अद्यापही हे बदल कायम आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. त्यानंतर बदलीचा क्रम सुरू झाला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांनाही पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळं पोलिस दलातही फेरबदल होणार आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतरचा क्रमही ठरला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार संवर्गातील बदली प्रक्रियाही त्यानंतर होणार आहे.
ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन, मृद व जलसंधारण, सहकार अशा विभागांमध्येही बदली सत्र त्यानंतर होणार आहे. सध्या बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाची यादी तयार केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे, त्यांची वेगळी यादी तयार होत आहे. सर्व यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: लक्ष ठेऊन आहेत. आरोग्य, अन्न नागरी पुरवठा विभाग, आदिवासी विकास विभागातील बदली प्रक्रिया त्यानंतर राबविली जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातही फेरबदल होणार आहेत. उद्योग, कृषी विभागातही परिवर्तन होणार आहे. जलसंपदा, नियोजन विभागाचा क्रमांक त्यानंतर येणार आहे. बदली प्रक्रियेचे टप्पे नव्या सरकारनं ठरविले आहेत.

अनेक Minister गायब
अद्यापही मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्राधान्य क्रम विभागानुसार ठरविण्यात आला आहे. पदभार स्वीकारलेल्या व न स्वीकारलेल्या मंत्र्यांच्या विभागातील प्रत्येक यादीवर मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत. बदलीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया कशी राबवायची याची सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना देऊन ठेवली आहे. मंगळवारी, 7 जानेवारीला नियमानुसार आठ आयएएस अधिकाऱ्यांनी बदली करण्यात आली. यात मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांचा समावेश आहे. त्यांना पर्यावरण विभागाचं सचिव करण्यात आलं आहे. विदर्भात कामाचा अनुभव असलेल्या रीचा बागला या आता वित्त विभागाच्या प्रधान सचिव असतील. त्यांच्याकडं लेखा व कोशागार विभाग असेल. अन्शू सिन्हा यांना सहकार मार्केटिंग आणि वस्त्रोद्योग विभागाचं प्रधान सचिव करण्यात आलं आहे.
विदर्भात कामाचा अनुभव असलेल्या आणखी एका अधिकाऱ्याला बदली देण्यात आली आहे. एन. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असतील. सोना आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव होते. वित्त विभागातून डॉ. रामास्वामी एन. यांची बदली कृषी विभागाच्या सचिव पदावर करण्यात आली आहे. विरेंद्र सिंह हे आता आरोग्य विभागाचे सचिव असतील. सिंह आतापर्यंत सहकार, मार्केटिंग, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव होते. प्रदीप पी. यांना महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करण्यात आलं आहे. माणिक गुरसाळ हे नाशिकच्या एनएमआरडीएचे आयुक्त असतील.