महाराष्ट्र

भंडारा, गोंदियात सगळं फिक्स; मग भाजपला कशाची वाटते रिस्क?

नागपुरातील दोन नेत्यांना BJP कडून निवडणुकीची जबाबदारी

Share:

Author

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. अशात सगळं काही ठरलेलं असताना भाजपनं नागपुरातील दोन त्यांना निरीक्षक म्हणून नेमलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. पूर्व विदर्भातील महत्वाचे असलेल्या भंडारा, गोंदिया येथे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काय करायचं हे सर्व आधीच फिक्स झालं आहे. त्यानंतरही भारतीय जनता पार्टीकडून नागपुरातील दोन नेत्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. सगळं आधीच ठरलेलं असताना आता दुसऱ्या जिल्ह्यातील हे दोन निरीक्षक भंडारा व गोंदिया जिल्ह्यात जाऊन करणार तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा गृहजिल्हा असलेल्या गोंदियात 24 जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. दुसरा जिल्हा आहे भंडारा. भाजपचे हेवीवेट नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांची भंडारा ही ‘होमपीच’ आहे. भंडाऱ्यात 27 जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीनं आपला फार्मूला फिक्त केला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राहणार आहे. उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहे. दोन्ही ठिकाणी कोण अध्यक्ष होणार अन् कोण उपाध्यक्ष हे देखील ठरलेलं आहे. त्यानंतरही भाजपनं दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

काँग्रेसचे गटनेता पद Nana Patole यांच्या नशिबी अवघड

नेमका खटाटोप कशासाठी?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा, गोंदियासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. भंडाऱ्यासाठी निरीक्षक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गोंदियाची जबाबदारी माजी आमदार गिरीश व्यास यांच्याकडं देण्यात आली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात डॉ. परिणय फुके आणि प्रफुल पटेल यांचं नावच काफी आहे. अध्यक्ष, पदाध्यक्ष निवडीचा हा फार्मूला या दोन नेत्यांनी मिळवून ठरविलेला असेल. ही बाब काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अध्यक्ष कोण होणार हे नावही निश्चित आहे. उपाध्यक्षाचं नावही ठरलेलं आहे. डॉ. फुके आणि पटेल यांच्या शब्दाबाहेर जिल्हा परिषदेचे सदस्य जातील असं अजिबातच चित्र नाही. उलट हे दोन्ही नेते आपापले जिल्हे सक्षमपणे सांभाळण्यास समर्थ आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही जिल्ह्यांसाठी कोणालाही निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेलं नाही. भाजपनं मात्र दोन जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळं ‘जब मॅच है फिक्स, तो बीजेपी को क्या लगती है रिस्क’ अशी चर्चा दोन्ही जिल्ह्यात सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काढलेलं निरीक्षक नियुक्तीचं हे पत्र आता दोन्ही जिल्ह्यात व्हायरल झालं आहे. त्याबाबत भाजपच्या वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातून हळूहळू भंडाऱ्याकडं सरकत असल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळं ‘ऑल इज वेल आहे ना’, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!