
महाराष्ट्राच्या राजकारणावर एकेकारी अधिराज्य गाजविणारं नाव म्हणजे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे. युतीच्या सरकारमधील मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडी बरीच गाजली. पण आता त्याचा मुंडे यांच्या परिवारावर संकटांचा फेरा संपता संपेनासा झाला आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी समर्थपणे सांभाळला. अल्पकाळातच त्या महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात चमकता तारा बनल्या. पण मुख्यमंत्री पदाच्या अनावश्यक अपेक्षेनं त्यांचा घात केला. बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला. या निर्णयाला उघडपणे विरोध केला तो ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी. पक्षनेतृत्वानं केलेली निवड त्यांनी नाकारली. त्यामुळं खडसे यांना भाजप सोडून राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हातावर बांधाव लागलं. आता हे ‘घड्याळ’ही भाजपनं शरद पवार यांच्याकडून हिसकावलं आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पवारांनी आता तुतारीवाला माणूस हे चिन्ह स्वीकारलं आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अजितदादांच्या मदतीनं या तुतारीची पुंगी वाजवली. त्यामुळं खडसे यांना आता कुठे जावं अन् कुठे नको, असा प्रश्न पडला आहे.
खडसे यांच्यासारखीच पण काहीशी ‘अॅडव्हान्स व्हर्जन’ची चूक पंकजा मुंडे यांनी केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीरपणे आपणच लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं घोषित करून टाकलं होतं. त्यांनी उघडपणे फडणवीस यांना विरोध केला नाही. मात्र त्यांची कृती विरोधापेक्षा काही कमीही नव्हती. त्यामुळं त्यांनाही भाजपनं दंड केला. पंकजा मुंडे यांना निवडणुकीपासून मुकावं लागलं. कालांतरानं त्या नरमल्या. त्यामुळं आता त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आहे. कॅबिनेट मंत्रीही करण्यात आलं आहे. मंत्री झाल्यानंतर पत्रकारांनी नागपुरात त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली.

आता आपण उगाच कोणत्याही वादात पडू इच्छित नाही. कोण काय बोललं यावर आपण बोलत बसणार आहे. आपण केवळ आपल्या कामाचं आणि विभागापुरतं बोलणार असल्याचं पंकजा यांनी सांगितलं. यावरून ठेचाळल्यानंतर बरंच काही शिकल्याचं पंकजा मुंडे यांनी दर्शवून दिलं. आमदार झाल्यानंतर पंकजाताईंच्या मागे लागलेली साडेसाती संपली हे स्पष्ट झालं. पण ताईंची साडेसाती संपली अन् त्यांच्या धनुभाऊंना अर्थात धनंजय मुडं यांना शनीची ढय्या लागली की काय? असं चित्र राज्यात निर्माण झालं.
इडापिडा सुरू झाली
शनीच्या साडेसातीपेक्षाही ज्योतिष्यात शनीची ढय्या जास्त पीडादायक मानली जाते. साडेसाती साडेसात वर्षांची असते. ढय्या ही अडीच वर्षांची मिनी साडेसाती म्हणून ओळखली जाते. पण साडेसातीपेक्षाही ढय्या सुरू असताना शनिदेव व्यक्तीला चांगला कर्माचं फळ स्वरूपात दंड देतात असं ज्योतिष्य शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळं महायुतीचं सरकार स्थिरावत नाही तोच धनुभाऊ अडचणीत सापडले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येवरून महाविकास आघाडीनं वाल्मिक कराडला टार्गेट केलं. वाल्मिक कराड हा धनुभाऊंचा खास माणूस. त्यामुळं सहाजिकच टीकेचे बाण विरोधकांनी धनुभाऊंना टोचणं सुरू केलं.
भरीस भर म्हणून भाजपच्या नेत्यांनीही धनंजय मुंडे यांना घेतलं. त्यामुळं कॅबिनेट मंत्री असूनही धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं. देशमुख यांच्या हत्येवरून सुरू झालेलं संकटाचं चक्रव्यूह आणखी गडद झालं. कृषी विभागानं एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला. विम्याच्या या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. एकट्या बीड जिल्ह्यातून मोठा घोटाळा उघडकीस आल्याचा दावा केला जाऊ लागला. त्यामुळं पीक विमा योजनाच गुंडाळावी, अशी शिफारस करण्यात आली. आता या विषयावरूनही देवाभाऊ आणि अजितदादांना चौकशी लावावीच लागणार आहे.
चौकशी टीमच बदलली
वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटी नेमली होती. एसआयटीमधील अधिकारीच कराडला पाठिशी घालत असल्याचा आरोप झाला. त्यामुळं अख्खी एसआयटी बदलावी लागली. आता कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ससेमिराही धनंजय मुंडे यांच्या मागं लागण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी या विभागात बरेच बदल केले. साहित्य खरेदीची पद्धत बदलली. त्यावरूनही टीका होत आहे. मुंडे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची आड घेत शिवसेना उद्धव ठाकरे गट दादांना मशालीचे चटके देऊ पाहात आहे.
शरद पवार गटानंही दादाना टार्गेट करीत जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तुतारी फुंकणं सुरू केलं आहे. निवडणूक झाल्यापासूनच महायुतीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचं नाव अनेक दिवस ठरलं नव्हतं. नाव ठरलं तर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी रुसून बसले. त्यानंतर ते गावी जाऊन बसले. आता गावावरून ते मुंबानगरीत परतले तर पालकमंत्री पदावरून अडून बसले, असं सगळं चित्र आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांचं काम मात्र अगदी ‘स्मुथली’ सुरू आहे. पण सरकारचे प्रमुख म्हणून त्यांना धनुभाऊंनी केलेल्या कृत्यासाठी उत्तरदायी व्हावंच लागणार आहे. देवाभाऊंनी पंकजाताईंना सोबत घेतल्यानं त्या राजकीय वनवासातून बाहेर पडल्याचं दिसत आहे. पण लगेचच धनुभाऊंना कडक ढय्या लागल्यानं टीव्हीवर येणाऱ्या त्या एका सिमेंटच्या जाहिरातीप्रमाणं मुडं बंधुभगिनी एकमेकांना संकटाची ‘भय्या ये दिवार तुटटी क्यो नहीं है..’ असा प्रश्न सध्या विचारत तर नसतील ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.