महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री मदत कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधीशी संबंधित सेवा सहज उपलब्ध होणार असून वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.राज्य सरकारने 22 जानेवारी 2025 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला असून, या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि आर्थिक मदत सहजपणे मिळणार आहे. यापूर्वी या सेवांसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईतील मंत्रालयात जावे लागत असे, ज्यामुळे वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू नागरिकांची गैरसोय टाळणे. आतापर्यंत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मंत्रालयात येऊन अर्ज सादर करावा लागत असे. अर्जाच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येचे मूळ समजून मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या प्रमुख रामेश्वर नाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. यासोबतच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
निधीची गरज
मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या कक्षांमध्ये नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीशी संबंधित सर्व माहिती मिळणार असून, अर्जांच्या फॉलोअपसाठी त्यांना अन्यत्र प्रवास करावा लागणार नाही. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा मिळणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. अनेकवेळा मंत्रालयात येणे कठीण असल्याने लोकांना मदतीपासून वंचित रहावे लागायचे, मात्र आता या निर्णयामुळे अशा अडचणी दूर होतील.
मुख्यमंत्री मदत कक्षासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली तयार केली जात असून, याद्वारे अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती तपासता येईल. तसेच अर्ज मंजूर होण्यापासून ते निधी वितरित होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होणार आहे. रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना घरबसल्या अर्ज सादर करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या प्रक्रियेसाठी एक विशेष विभाग तयार करण्यात येणार आहे, जेथे नागरिकांना सर्व प्रकारची माहिती आणि मदत दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री मदत कक्षाद्वारे अनेकांचे प्रलंबित अर्ज मार्गी लागणार आहेत. यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा वाचेलच, पण प्रक्रिया अधिक कार्यक्षम व सोपी होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गरजू रुग्ण आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. हा निर्णय म्हणजे सामान्य माणसासाठी घेतलेला सकारात्मक आणि ठोस पाऊल आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना योग्य वेळी मदत मिळण्याची हमी मिळणार आहे.
