
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनुसार प्राप्त झाली आहे. त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती होणार.
राज्याच्या वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या राजीनामा देण्यार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रश्मी शुक्ला कथित फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख (NIA) सदानंद दाते यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे.
सदानंद दाते कडक शिस्तीचे समजले जाणारे व्यक्तिमत्व आहे. यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु याला अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

फोन टॅपचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 2014 ते 2019 या काळात राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुखपद सांभाळले होते. त्या कालावधीत त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा ठपका लावला होता. मात्र, 2022मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला.
रश्मी शुक्ला 1988च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सशस्त्र सीमा दलाचे केंद्र प्रमुख आणि पुणे पोलीस आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला यांनी काम पाहिले आहे. पण आता वैयक्तिक तसेच तब्येतीच्या कारणास्तव पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देण्यार असल्याची माहिती सूत्रांनुसार प्राप्त झाली. आता त्यांच्या जागी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांची नियुक्त करण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेसकडून रश्मी शुक्ला यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती. राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालकपदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तर, संजयकुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 25 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री उशिरा याबद्दलचे आदेश काढण्यात आले होते.