राज्यात राजकारणाची हवा कधी इकडे तर कधी तिकडे जाऊ लागली आहे. शिंदे गटात अनेक नेत्यांच्या प्रवेशानंतर आता अजित पवार गटातही अनेक नेते प्रवेश करतील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे गटातील नेते धडाधड शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडत आहेत. ठाकरे यांच्या गटातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेतेही अजित पवार गटात प्रवेश करणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते सुनील तटकरे यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आता आमच्या पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. एक बडा नेताही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच सुनील तटकरे यांनी दावा केला आहे.
तरीही विजय झाला
संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यांनी अजित दादांसोबत सखोल चर्चा देखील केली. परंतु याबाबत निर्णय होऊ शकला नाही. संजीवराजे निघून गेल्यावर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमदेवार विजयी झाला आहे. असं सांगतानाच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. तसेच आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
योगेश कदम यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत काम केलं नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यावरही सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. जेव्हा शिवसेना नेते रामदास कदम स्वतः माझ्याकडे ही तक्रार करतील, तेव्हा त्याची मी जरूर माहिती घेणार. कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड आणि गुहागर माझ्या मतदारसंघात येतो. त्यामुळे रामदास यांनी जरूर लवकरात लवकर मला तसं पत्र द्यावं. त्याचं मी अवलोकन करून माहिती देखील घेणार. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी काय काय घडलं ते सगळं समजून घेणार. रामदास कदम यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चर्चा करू, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले होते कदम
प्रसार माध्यमांची संवाद साधताना रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला नाही. काही लोक तर थेट उद्धव ठाकरे यांच्या गटात गेले होते. त्या सर्वांचीच नावे मला माहीत आहे. आपण सुनील तटकरे यांना भेटून याबाबतची लेखी तक्रार करणार, असे रामदास कदम म्हणाले. माझे सुनील तटकरे यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे चांगले मित्र आहे. पण युतीत या गोष्टी होऊ नये, यासाठी मी त्यांच्या कानावर विधानसभेतील प्रकार टाकणार आहे, असं रामदास कदम म्हणाले होते.
