छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली. या पोस्टवरून भाजप नेत्यांनी गांधींना धारेवर ठरले आहे. त्यानंतर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त अनेक नेत्यांनी महाराजांना अभिवादन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत शिवरायांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पोस्टवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका करत, “राहुल गांधी यांनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली, हा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील शिवप्रेमी जनतेचा अपमान आहे,” असे म्हटले. त्यांच्या मते, जयंतीदिनी आदरांजली व्यक्त केली जाते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे राहुल गांधींनी हे ट्विट त्वरित मागे घ्यावे, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजपचा घणाघात
भातखळकर यांनी पुढे आरोप केला की, “राहुल गांधी यांच्या कुटुंबाचा इतिहास पाहता, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यांचे पूर्वज मुघलांच्या आरत्या ओवाळत होते. त्यामुळेच जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणे हा केवळ त्यांच्या अज्ञानाचा भाग नाही, तर तुष्टीकरणाच्या राजकारणातून घडलेला प्रकार आहे, असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.
राहुल गांधींवरील या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर पलटवार केला. सपकाळ म्हणाले की, “विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधींवर राजकारण सुरू केले आहे. हे त्यांचे नवे राजकीय डावपेच नाहीत. पूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतही असेच करण्यात आले होते.
ध चा मा करु नये
सपकाळ पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या ट्विटचे भाषांतर गुगल ट्रान्सलेटमध्ये केल्यास ‘श्रद्धांजली’ असा शब्द येतो. ही तांत्रिक चूक आहे, त्याचा अर्थ राहुल गांधींनी अपमान केला, असा होत नाही. त्यांनी शिवरायांना आदरांजली वाहिली आहे. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्याच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ध चा मा करु नये. विरोधक या मुद्द्यावर राजकीय लाभ उठवत आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सन्मान की राजकारणाचा विषय?
राहुल गांधी यांच्या एका ट्विटवरून सुरू झालेला हा वाद आता संपूर्ण राज्यभर गाजू लागला आहे. भाजपने त्यांच्या भूमिकेला हिंदुत्वाशी जोडत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तर काँग्रेसने हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याचा दावा केला आहे.
शिवजयंती हा अभिमानाचा दिवस आहे. या निमित्त राजकीय पक्षांनी वाद घालण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, असे मत अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.