राज्यातील अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर विरोधकांनी रान पेटवलं आहे. तिजोरी रिकामी असल्याचा मुद्दा पुढा केला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे तारणहार ठरतील असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. महायुतीची सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिला अर्थसंकल्प लक्षवेधी ठरणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पातून काहीही देऊ शकणार नाही, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात यापूर्वी देखील कोविडची महासाथ होती. जगाचं अर्थचक्र थांबलं होतं. त्यावेळी देखील अजित पवार यांनी राज्याला तारलं होतं. अर्थमंत्री म्हणून अजितदादांना आर्थिक शिस्त लावण्याचा अनुभव मोठा आहे. त्यामुळं यंदाही दादा तारणहार ठरतील असा दावा आमदार मिटकरी यांनी केला.
राज्याची तिजोरी कोणी रिकामी केली हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. सामान्यांचा पैसा कोणी खाल्ला हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर गेल्या अर्थसंकल्पातही दादांनी अनेक योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण होणार नाही, असं विरोधक सांगत होते. विरोधक या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. परंतु अजितदादांनी योजना यशस्वी करून दाखविली. त्यासाठी त्यांनी आर्थिक तरतूद करून ठेवली होती. अर्थमंत्र्याला राज्याच्या तिजेारीची स्थिती चांगलीच ठाऊक असते. विरोधकांना तिजोरीत काय आहे, हे ठाऊक नाही. ते केवळ हवेत गोळीबार करीत आहेत, असे मिटकरी म्हणाले.
दादांची धास्ती
अजित पवार हे राज्याला आर्थिक शिस्त लावत आहेत. त्यासाठी त्यांनी काही कठोर निर्णयही घेतले आहेत. याची महाविकास आघाडीतील नेत्यांना भीती वाटत आहे. त्यामुळं मनात येईल ते आरोप विरोधक करीत सुटले आहेत. विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. शेतकरी, तरूण, बहिणी अशा सगळ्यांच्या हिताचा निर्णय अजित पवार घेतील असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी आतापर्यंत अनेकदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामुळं कुठे काय केलं पाहिजे, हे त्यांना चांगलेच ठाऊक असल्याचं मिटकरी म्हणाले.
घोडा मेदान जवळ आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेकांची तोंडं बंद होतील. यंदाचा अर्थसंकल्प सामान्यांच्या हिताचाच असेल. अर्थसंकल्पातून कोणाचीही निराशा होणार नाही, असा दावाही आमदार मिटकरी यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकार हे एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचं काम करीत आहेत. निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीचा पूर्ण सफाया झाला. अर्थसंकल्पानंतर उरलीसुरली महाविकास आघाडीही वाहून जाईल, असा विश्वासही आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.