महाराष्ट्र

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गावात थेट दंगल

Maharashtra : उपराजधानीत औरंगजेब कबरीचा मुद्दा पेटला 

Share:

Author

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरात हिंदू-मुस्लिम गटांमध्ये वाद विकोपाला, दगडफेक आणि जाळपोळ, झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात 17 मार्च रोजी दुपारी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून मोठे आंदोलन करण्यात आले. दुपारच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळपर्यंत जास्त भडकलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातच मोठा तणाव निर्माण झाला आहे. नागपुरातील महाल भागात सोमवारी संध्याकाळी अचानक दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. द लोकहित लाईव्हने याची सविस्तर बातमी देत आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या घटनेमुळे नागपूर शहर हादरले आहे. पोलिस प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

Dr. Parinay Fuke : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या  

पोलीस प्रशासन अलर्ट

सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. एका गटाने घोषणाबाजी सुरू केली, त्यानंतर दुसऱ्या गटानेही प्रत्युत्तर दिले आणि बघता बघता वाद वाढत गेला. काही वेळातच हातघाईची परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक दगडफेक सुरू झाली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली, रस्त्यावरील ई-रिक्षा आणि ऑटो पलटवून रस्ते अडवले. अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिस उपयुक्त निकेतन कदम यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपद्रवी तत्वांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. अखेर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव नियंत्रित करावा लागला. विशेष म्हणजे, कोतवाली आणि गणेशपेठ भागातही हिंसाचाराचे लोण पसरले, त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. तणाव वाढताच नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

फडणवीसांकडून शांततेचे आवाहन

संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कार्यालयानेही सतत पोलिस प्रशासनाशी संपर्क ठेवत असल्याची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले. आपण सर्वांनी एकजूट राहून नागपूरची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.

कशामुळे पेटला वाद? 

सुरुवातीला हा वाद घोषणाबाजीवरून सुरू झाला असला तरी त्याच्या मुळाशी औरंगजेबाच्या कबरीचा वाद असल्याचे समोर आले आहे. विश्व हिंदू परिषदेनं दुपारी एक आंदोलन केले होते, त्याच दरम्यान काही स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला. संध्याकाळी त्याच वादाला वेगळे वळण लागले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर आले. काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली.

नागपूर हे मुख्यमंत्री फडणवीसांचे गाव आहे. या शहरातच अशा प्रकारची हिंसा उसळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असले तरी हिंसाचाराने शहर दणाणून गेले आहे. नागपूरमध्येच अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर राज्यभर काय परिस्थिती असेल? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

दरम्यान, महाल भागात अजूनही पोलीस तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे, मात्र, या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!