औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात निर्माण झालेल्या तणावामुळे आरएसएस मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता गंभीर रूप धारण करत आहे. महाल परिसरात हिंदू-मुस्लिम गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावानं हिंसाचाराचं रूप घेतलं आहे. दगडफेक, जाळपोळ आणि वाढत्या अशांततेमुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करत, अफवांना बळी न पडण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका करत गंभीर आरोपांचा सिलसिला सुरु केला आहे.
Maharashtra : नागपुरात दंगलीनंतर पश्चिम विदर्भात पोलिसांचा हाय अलर्ट जारी
पोलिसांचा बंदोबस्त
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे १७ मार्च रोजी नागपुरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिमेचं दहन केलं. सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात होती, मात्र संध्याकाळ होताच वाद अधिक चिघळला आणि संपूर्ण नागपूर शहरात तणाव निर्माण झाला.
महाल परिसरात दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली, जाळपोळही घडली. या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या भागात तातडीने बंदोबस्त वाढवला, पण जमाव अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावावर नियंत्रण मिळवावं लागलं.
राजकीय रंग
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली घडत आहेत. विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत परिस्थिती बिघडल्याचा आरोप केला आहे. विशेषतः नागपुरातील या घटनेनंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोतवाली आणि गणेशपेठ या भागांमध्येही हिंसाचाराची लाट पसरली. या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानं पोलिसांना आणखी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवावा लागला. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
Nagpur Riot : दंगलीनंतर सायबर सेलचे पूर्ण महाराष्ट्रावर बारीक लक्ष
शांततेचे आवाहन
संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. “नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं,” असं ते म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालय पोलिस प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. नागपुरातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. समाजकंटकांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना राबवत आहे.