नागपूर ग्रामीण पोलिस विभागात कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि दीर्घ अनुपस्थितीमुळे 13 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानंतर ही शिस्तभंगविरोधी कारवाई पार पडली असून विभागात खळबळ उडाली आहे.
पोलिस विभागातील शिस्त आणि जबाबदारीच्या मूल्यांची जपणूक करत नागपूर ग्रामीण जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात सातत्याने हलगर्जीपणा आणि दीर्घ अनुपस्थितीचा जाब विचारत जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 13 पोलिस कर्मचाऱ्यांना थेट निलंबित केले आहे. या निर्णयामुळे पोलिस दलात खळबळ उडाली. ही कारवाई भविष्यातील प्रशासनिक दृष्टीकोन स्पष्ट करणारी ठरली आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये 1 पोलिस उपनिरीक्षक, 1 पोलिस हवालदार, 3 पोलिस नाईक, 85 दिवसांहून अधिक अनुपस्थित राहिलेले 7 पोलिस शिपाई, तसेच नरखेड, सावनेर आणि कलमेश्वर पोलीस ठाण्यांतील काही हवालदारांचा समावेश आहे. याशिवाय मोटार परिवहन विभागातील 1 पोलिस शिपायावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी कर्तव्यातील शिथिलतेमुळे सतत वरिष्ठांच्या रडारवर होते.
Ashish jaiswal : राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला कृषी क्षेत्राचा रिपोर्ट कार्ड
शिस्तीचा पुनरुच्चार
कारवाईमागील मुख्य उद्देश पोलिस विभागात शिस्त आणि जबाबदारीचे भान निर्माण करणे, हेच स्पष्टपणे दिसून येते. हर्ष पोद्दार हे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती, कामगिरी आणि आचरणाबाबत स्पष्ट आदेश दिले होते. काही कर्मचाऱ्यांकडून सातत्याने हलगर्जीपणा आणि गैरहजेरीची तक्रार प्राप्त होत होती. या पार्श्वभूमीवर वारंवार इशारे, नोटीस आणि प्रशासकीय संवाद करूनही सुधारणा न झाल्यामुळे अखेर त्यांनी थेट निलंबनाची टोकाची कारवाई केली.
ग्रामीण पोलिस दलात ही कारवाई अनुशासनाच्या दृष्टिकोनातून मैलाचा दगड ठरत आहे. इतर कर्मचाऱ्यांना देखील याचा परिणाम होईल, असे जाणकारांचे मत आहे. शिस्तपालन, नियमित उपस्थिती आणि जबाबदारीने वागणे हे पोलिस सेवेचे मूलभूत तत्त्व आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही कारवाई धडा ठरणार आहे.
विश्वासाचा पाया
अशा प्रकारच्या कारवाया केवळ शिक्षा म्हणून न पाहता, त्या विभागात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून केल्या जातात. पोलीस खात्यात काम करणारा प्रत्येक अधिकारी हा जनतेचा संरक्षक असतो. त्याने आपल्या भूमिकेत कोणतीही शिथिलता दाखवली, तर ते केवळ त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीस नव्हे, तर संपूर्ण खात्याच्या प्रतिमेस हानी पोहोचवणारे ठरते.
निलंबित कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण 85 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी बिनमाहित अनुपस्थित होते. त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र, सुधारण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने हर्ष पोद्दार यांनी ही कठोर पण आवश्यक कारवाई केली.