
शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही बँकांनी त्यांना पीककर्ज नाकारले, आता सरकारने या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे थेट निर्देश देत थरकाप उडवला आहे.
शेतकऱ्याने पिकवले, पण त्याच्या स्वप्नांवर बँकांनी गारठा टाकला तर शासन गप्प बसणार नाही, असा रोखठोक इशारा राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँक व्यवस्थापनांना दिला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे, त्यांना वेळेवर मदत मिळावी या सकारात्मक दृष्टिकोनातून पीककर्ज योजना राबवली.

अनेक शेतकऱ्यांनी ‘ओटीएस’ (One Time Settlement) अंतर्गत कर्जफेड करूनही त्यांना पुन्हा पीककर्ज मिळाले नाही. यामुळे बँकांच्या भूमिकेवर आता सरकारने कडक पवित्रा घेतला आहे.
नागपुरातील नियोजन भवनात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत बावनकुळे यांनी संतप्त भाषेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारच्या योजनेचा फायदा घेत, कर्जफेड करूनही ज्या शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज नाकारले, अशा बँकांवर आता कारवाई होणारच. गरज भासल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
संतप्त प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व अग्रणी बँक व्यवस्थापकांनी वेळोवेळी बैठक घेऊन आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. पण असे करूनही बँका जर सहकार्य करत नसतील, तर त्यांच्यावर कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
बँकांची मनमानी व निष्क्रियता आता सहन केली जाणार नाही. गरजूंना नाकारलेले कर्ज हे अन्यायकारक आहे. सरकार अशा संस्थांना माफ करणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
B.R Gavai : न्यायमूर्ती त्रिवेदींना निरोप सरन्यायाधीशांचा बारवर संताप
कर्ज फेडूनही पीककर्ज न देणाऱ्या बँकांची गाठ आता थेट सरकारशी आहे. ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी कुणीही आडवा आला तर शासन हात आखडता घेणार नाही, हा स्पष्ट संदेश यामुळे दिला गेला आहे.
शेतकऱ्याच्या बाजूने उभे असलेले सरकार आणि अन्याय करणाऱ्यांवर कोसळणारी कारवाई, विदर्भातील ही बातमी केवळ निर्णय नव्हे, तर नवा शेतकरीवर्ग उभा करणारी लढाई ठरणार आहे.
बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला. आगामी पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना करा, पण पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे रक्षण हेच आपले प्राधान्य असावे. ते पुढे म्हणाले, पूर्वतयारी हीच आपली खरी शक्ती आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, मदतकार्य वेगाने पोहोचवा आणि प्रशासनाने नागरिकांचा विश्वास कायम राखावा.