
चंद्रपूर जिल्हा परिषदेत पुल्कित सिंह यांच्या नेतृत्वात 3 दिवसांत 299 बदल्यांची धडाकेबाज मोहीम राबवली गेली. यामुळे प्रशासनात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय घडामोडींमध्ये एक मोठा भूकंप झाल्यासारखा परिणाम दिसून आला आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी पुल्कित सिंह यांनी अवघ्या तीन दिवसांत तब्बल 299 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून खळबळ उडवून दिली आहे. याआधी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात व वेगाने बदल्यांची प्रक्रिया राबवली गेली नव्हती.

पंधरवड्यापूर्वी पुल्कित सिंह यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, 9 मे रोजी बदल्यांची मोहीम सुरू झाली. 11 मे रोजी ती पूर्ण झाली. बदल्यांचे प्रमाण पाहता, या प्रक्रियेने सर्वच कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या बदल्यांमध्ये प्रशासकीय आदेश तसेच विनंतीच्या आधारे बदली करण्यात आली आहे. यामध्ये संवर्ग ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पंचायत विभागात खळबळ
विविध विभागांतील कर्मचारी 9 ते 11 मे या कालावधीत नव्या जागी पोहोचले. बदल्यांचा पहिला टप्पा 9 मे रोजी सुरू झाला. यामध्ये शिक्षण विभागातील 8, बांधकाम विभागातील 14, ग्रामीण पाणीपुरवठा 1, वित्त विभागातील 14 आणि पशुसंवर्धन विभागातील 7 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 10 मे हा दिवस पंचायत विभागासाठी निर्णायक ठरला. या दिवशी 76 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली.
कृषी विभागातून 4, महिला व बालकल्याण विभागातून 7 आणि 4 आपसी बदल्याही राबवण्यात आल्या. ही संख्या सुद्धा या विभागांमधील गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. 11 मे रोजी सामान्य प्रशासन विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. कनिष्ठ प्रशासन अधिकारी 5, वरिष्ठ सहायक 23 आणि कनिष्ठ सहायक 66 कर्मचाऱ्यांची नावं यामध्ये होती.
कारभारात नवे पर्व
आरोग्य विभागातही बदल्यांची लाट पाहायला मिळाली. आरोग्य पर्यवेक्षक 3, आरोग्य सहायक 4, आरोग्य सहायक (स्त्री) 3, आरोग्य सेवक (पुरुष) 23 आणि आरोग्य सेविका 37 अशा एकूण 70 कर्मचाऱ्यांची बदल्या या विभागात करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बदल्यांची अंदाजे 10 टक्के प्रशासकीय तर 5 टक्के विनंतीच्या आधारे केल्या गेल्या आहेत. ही प्रक्रिया कोणतीही अडचण न येता पूर्णत्वास नेण्यात आली असून, तिचे नेतृत्व पुल्कित सिंह यांनी अत्यंत कौशल्याने केले.
बदल्यांची यादी आणि प्रक्रियेबाबतची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत यांनी प्रसिद्धीस दिली.या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात एक नवे पर्व सुरू होईल, अशीच चर्चा आता जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे. गती आणि निर्णयक्षमता हे पुल्कित सिंह यांच्या कारभाराचे पहिलेच उदाहरण ठरत आहे.