
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गंभीर घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांच्या ऑडिटचा धडक निर्णय घेतला आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील शिस्त आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या गंभीर घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली आहे. दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यभरातील सर्व खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. आरोग्यसेवा देताना रुग्णांच्या सुरक्षेची आणि हक्कांची योग्य ती काळजी घेतली जाते का, याची सखोल तपासणी केली जाईल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णहितास प्राधान्य देणाऱ्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Maharashtra : नागपूरच्या पांडे, निमदेव यांची माहिती आयुक्तपदी वर्णी
पारदर्शकतेला मिळणार बळ
आरोग्यसेवेच्या नावाखाली रुग्णांवर लादल्या जाणाऱ्या अनावश्यक खर्चांची, चुकीच्या निदानाची व उपचारपद्धतींची शहानिशा होणार आहे. ऑडिटच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन, बिलिंग प्रक्रिया, तांत्रिक सुविधा आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यात येईल. हे पाऊल रुग्णांचे हक्क आणि सुरक्षितता यांचे रक्षण करण्याच्या दिशेने एक ठोस टप्पा ठरणार आहे.
आरोग्य यंत्रणेला वळण
निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक उत्तरदायी आणि जनहिताभिमुख होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आरोग्यमंत्र्यांचा हा निर्णय केवळ तपासणीपुरता मर्यादित न राहता, भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाचा पाया घालणारा ठरणार आहे. खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवत आरोग्य व्यवस्थेतील शिस्त व विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा हा निर्णय एक निर्णायक टप्पा मानला जात आहे.
आरोग्य क्षेत्रात निर्माण झालेल्या अविश्वासाच्या छायेत, हे धोरण रुग्णांचे अधिकार आणि सुविधा यांना बळकट करणारे ठरेल. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागात होत असलेल्या या व्यापक सुधारणांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील.